सासवड नगर परिषदेच्या कचरा संकलनकार्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:45 PM2019-01-07T23:45:11+5:302019-01-07T23:45:27+5:30
दहा घंटागाड्या, दोन ट्रॅक्टर उपलब्ध : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत साह्य
सासवड : वाढते शहरीकरण व लोकसंख्येमुळे सासवड नगर परिषद क्षेत्रामध्ये जमा होणारा कचरा एकत्रित करून विल्हेवाट लावणारी यंत्रणा अपुरी पडत होती. त्यानुसार तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सासवड नगर परिषदेला १० घंटागाड्या व २ ट्रॅक्टर मंजूर झाले असून, यापैकी ४ घंटागाड्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले.
सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी याबाबत राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार ही वाहने पुरविण्यात आल्याचे भोंडे यांनी सांगितले. सासवड शहराला १० घंटागाड्या व २ ट्रॅक्टर मंजूर झाले असून, यापैकी ४ घंटागाड्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले. याप्रसंगी सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, जनमत विकास आघाडीचे प्रमुख संजय जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, सुहास लांडगे, संदीप जगताप, अजित जगताप, यशवंत जगताप, पुष्पाकाकी जगताप, मंगलनानी म्हेत्रे आदी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. सासवड शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यापूर्वी एकूण ८ वाहने होती. वाहनांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे व सासवड नगर परिषदेने केलेल्या मागणीनुसार आता
कचरा वाहतूक गाड्यांची संख्या २० झाल्यामुळे प्रत्येक वॉर्डनिहाय कचरा संकलनासाठी गाड्या उपलब्ध होणार आहेत. अधिकाअधिक
कचरा संकलनासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
कचरा संकलन करणाºया एका गाडीची क्षमता एका फेरीमध्ये ५०० किलोपर्यंत होती. एकूण ८ वाहनांमुळे दिवसभरात १० ते १२ टनापर्यंत कचरासंकलन होत होते. ते आता वाढून १२ ते २० टनांपर्यंत जाणार आहे. गाड्यांची संख्या कमी असल्याने नागरिक कचरा कोठेही टाकत होते. गाडी वेळेवर न आल्याने या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करता येत नव्हती. आता गाड्यांची संख्या वाढल्याने व कचरा वाहतूक वेळेवर होत असल्याने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. - विनोद जळक, मुख्याधिकारी
घरगुती कचºयाचे खत तयार करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सासवड नगर परिषदेने सहारा सिल्वर या सोसायटीची निवड केली आहे. सोसायटीत एकूण ७५ ठिकाणी ‘होम कंपोस्ट बास्केट’ व ‘कंपोस्ट कल्चर’ देण्यात येणार आहे. साधारणत: २१ दिवसांनी हे खत तयार होणार असून, याचा वापर याच सोसायटीत झाडांसाठी करण्यात येणार आहे.
- मार्तंड भोंडे, नगराध्यक्ष, सासवड