आमदार भोसलेंसह पत्नीचे ही संचालकपद काढले, सहकार आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:48 AM2017-09-19T00:48:22+5:302017-09-19T04:29:50+5:30
आमदार अनिल भोसले आणि त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांच्यावर सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी शिवाजीराव भोसले बँकेच्या संचालकपदावरून काढून टाकण्याची कारवाई केली आहे.
पुणे : आमदार अनिल भोसले आणि त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांच्यावर सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी शिवाजीराव भोसले बँकेच्या संचालकपदावरून काढून टाकण्याची कारवाई केली आहे. स्वत: संचालक असलेल्या या बँकेला स्वत:चीच जागा भाड्याने देऊन सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाच वर्षांची मुदत पूर्ण होईपर्यंत त्यांना अन्य कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालकपदाची निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेशही झाडे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम ५७ नुसार संचालक म्हणून काम करताना संबंधित बँकेशी कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध ठेवता येत नाहीत. मात्र, भोसले यांनी त्यांच्या स्वत:च्याच, तसेच कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये बँकेला भाड्याने जागा दिली. विद्यानगर, कोथरुड, डेक्कन, विश्रांतवाडी आणि येथे तसेच बँकेच्या शिवाजीनगर मुख्यालयासाठी आपल्या जागा भाड्याने दिल्याचे आदेशात म्हटले आहे. याबाबत सुधीर रामचंद्र आल्हाट (रा. शिवाजीनगर) यांनी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दिली होती. भोसले विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले या नगरसेविका आहेत. भोसले यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७८ (१) (ब) मधील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ५७ (१) अचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही सहकारी संस्थेत स्वीकृत सदस्यपदी किंवा नामनिर्देशित करण्यास अपात्र ठरविण्यासोबतच संचालकपदावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.
>भोसले यांनी महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम ५७ चे उल्लंघन केले आहे. या कायद्यानुसार संचालक असलेल्या व्यक्तीला संबंधित बँकेसोबत व्यावसायिक संबंध ठेवता येत नाहीत. त्यांनी स्वत:च्या मालमत्ता बँकेला भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.
- विजयकुमार झाडे, आयुक्त, सहकार