महामानवांच्या जयंतीदिनी गरजू विद्यार्थ्यांना माेफत मेस ; स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:26 PM2019-04-11T16:26:50+5:302019-04-11T16:28:18+5:30
स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना माेफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
पुणे : विद्यार्थ्यांनीच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेल्या स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना माेफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुम्बा सभागृहात आयाेजित कार्यक्रमात या मदतीची घाेषणा करण्यात आली. मुंबईच्या कॅरिंग फ्रेंड्स ग्रुप तर्फे ही मदत करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपचे निमेश सुमती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सुरेश भाेसले, स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, सचिव संध्या साेनवणे आदी उपस्थित हाेते.
दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. ज्यांना त्यांच्या मेसचा खर्च करणे शक्य नाही अशा गरजु विद्यार्थ्यांना स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे मदत करण्यात येते. या संस्थेतर्फे समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळविण्यात येत असून ती मदत या विद्यार्थ्यांना देण्यात येते. स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड ही विद्यार्थी आणि दानशूर लाेक यांच्यात एक दुवा म्हणून काम करते. आत्तापर्यंत शेकडाे विद्यार्थ्यांना या संस्थेतर्फे माेफत मेस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संस्थेचे काम पाहून मुंबईतील कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपने मदत करण्याचे ठरवले. मदत देण्यापूर्वी सुमती यांनी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करण्याची, व्यसन कधीही न करण्याची, तसेच एखाद्या गरजु व्यक्तिला मदत करण्याची शपथ घेतली. सुमती यांनी 300 विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च उचलला आहे.
सुमती विद्यार्थ्यांना म्हणाले, की ही मदत देत असताना मी काही गाेष्टींची अपेक्षा तुमच्या कडून करणार आहे. तुम्ही कधीही व्यसन करणार नाही, तुम्ही श्रमदान कराल आणि एखाद्या गरजूला मदत कराल या गाेष्टींची अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. वारे म्हणाले, मला येथील मुलांमध्ये एक सकारात्मक वातावरण दिसत आहे. मुलांची माेठी स्वप्ने आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हाेते की संघार्षातून पुढे आलेल्या लाेकांनी नेहमी मागे राहिलेल्यांना मदत करायला हवी. संघर्ष हा जर निवनिर्माणासाठी असेल तर ताे संवादाकडे जाऊ शकताे. सध्या निवडणुकीचं वातारवण असलं आहे. दुष्काळ, राेजगार या विषयांवर चर्चा हाेताना दिसत नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर आभार संध्या साेनवणे यांनी मानले.