अघटित रोखण्यासाठी पोलिसांची मदत करा

By admin | Published: November 25, 2015 01:12 AM2015-11-25T01:12:10+5:302015-11-25T01:12:10+5:30

दहशतवादासारख्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी काहीतरी केले पाहिजे, असे वाटत असेल तर नागरिकांनीही सजग राहून पोलिसांची मदत केली पाहिजे.

Help the police to break down | अघटित रोखण्यासाठी पोलिसांची मदत करा

अघटित रोखण्यासाठी पोलिसांची मदत करा

Next

पुणे : दहशतवादासारख्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी काहीतरी केले पाहिजे, असे वाटत असेल तर नागरिकांनीही सजग राहून पोलिसांची मदत केली पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीबद्दल नागरिकांनी पोलिसांना सांगावे, तो आपला हक्क आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले.
दीक्षित यांनी मंगळवारी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलला भेट दिली. ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी त्यांचा सत्कार केला.
या वेळी प्रवीण दीक्षित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रवीण दीक्षित यांच्या पत्नी अरूंधती दीक्षित, डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहसचिव जोत्स्ना एकबोटे, मॉर्डन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मानसी शास्त्री, मॉर्डन हायस्कूल शाला समितीचे अध्यक्ष चित्तरंजन कांबळे, प्रमुख्याध्यापक शरद इनामदार, माजी विद्यार्थी, मॉर्डन हायस्कुलचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत प्रवीण दीक्षित म्हणाले, या शाळेतील शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. त्यांनी स्वत:च्या मुलांपेक्षा जास्त लक्ष आमच्याकडे दिले असेल, त्यामुळेच आम्ही घडू शकलो. शिक्षण हे मातृभाषेतच घेतले पाहिजे. परखड विचार आणि साहित्याची समज यासाठी मातृभाषातील शिक्षणच महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांना नवनिर्मिती करण्यासाठी शाळेकडून प्रोत्साहन देण्यात यावे. मुलांचा राग आला तरी त्याला हिणवू नये. कारण मुले अतिशय संवेदनशील असतात. शिक्षकांनी दुर्लक्ष करण्याचा त्याचा मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो.
एकबोटे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटिच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला चांगले शिक्षण कसे मिळेल यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहीजेत. एसएमएसला लगेच उत्तर देणारे आणि एवढ्या मोठ्या पदावर असूनदेखील बोलण्यामध्ये अतिशय सौम्यपणा असलेले दीक्षित हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. मुख्याध्यापिका शास्त्री यांनी मॉर्डन हायस्कूलच्या ८० वर्षांच्या वाटचालीची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृगजा कुलकर्णी यांनी केले. निवेश पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Help the police to break down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.