Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीसाठी लोटली तोबा गर्दी; मागवावा लागला पोलीस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:43 PM2020-01-29T14:43:32+5:302020-01-29T15:13:05+5:30
Shiv Bhojan Thali : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये तर गर्दी आवरत नसल्याने चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे पोलीस बंदोबस्तात सुरु झाले आहे.
पुणे : २६ जानेवारीपासून सुरु केलेल्या शिववभोजन थाळीचा वाढता प्रतिसाद वितरकांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये तर गर्दी आवरत नसल्याने चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे पोलीस बंदोबस्तात सुरु झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'राज्यातील गरीब जनतेला परवडणाऱ्या दरात जेवण मिळावे या उद्देशाने महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ केला आहे. चार दिवस म्हणजे २६ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी या योजनेचे उदघाटन केले. त्यानंतर कमी दरात, पोटभर अन्न मिळत असल्याने वितरण केंद्रांवर चांगलीच गर्दी होत आहे.
मात्र दुपारी १२ ते २ अशी ठराविक वेळ आणि केवळ १५० थाळी वितरणाची अट असल्याने अनेकांची निराशा होते आहे.त्यातच पुण्यातील मार्केट यार्ड भागातील हॉटेल समाधान येथे वितरण केंद्रात हमाल आणि इतर मोलमजुरी करणाऱ्यांची गर्दी होत आहे. भुकेची वेळ असल्याने थाळ्या संपल्यावर वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता अखेर हॉटेल प्रशासनाने पोलिसांची मदत घेतली आहे.
याबाबत माहिती देताना व्यवस्थापक अंकुश मोरे म्हणाले की, ' शिवभोजन थाळीला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र थाळीची वितरण संख्या मर्यादित असल्याने त्या लवकर संपतात. अशावेळी रांगा तोडून धक्काबुक्की होऊ नये, थाळी संपल्यावर वादावादी होऊ नये म्हणून पोलिसांची मदत घेण्यात आली आहे'.