गरीब, पीडितांना मदत करा
By Admin | Published: December 12, 2015 12:38 AM2015-12-12T00:38:19+5:302015-12-12T00:38:19+5:30
‘‘गरीब, पीडितांना मदत करा, त्यातच खरे समाधान आहे. अशी मदत आपल्या आसपासच्या समाजात व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन करा,
सासवड : ‘‘गरीब, पीडितांना मदत करा, त्यातच खरे समाधान आहे. अशी मदत आपल्या आसपासच्या समाजात व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन करा, यासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, लोकबिरादरीचे प्रमुख पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले.
सासवड येथील (स्व.) एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या गुणवंत शिक्षक आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी के. जे. शैक्षणिक संकुलाचे प्रमुख कल्याणराव जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते संजय जगताप उपस्थित होते.
या वेळी संजय जगताप यांनी स्वार्थी भावनेतून मदत करणारे अनेक लोक आहेत. परंतु कोणताही स्वार्थ मनात न ठेवता समाजासाठी काम करणारे आमटे व त्यांचे कुटुंबीय मोठ्या मनाची माणसे असल्याचे उद्गार काढले. कुष्ठरोग्यांच्या तसेच नक्षलवादी भागातील मुलांना आम्ही शिक्षण देण्याचे काम करीत असल्याचे कल्याण जाधव यांनी मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी सासवड येथील वसंतराव नाना जगताप व नीरा वसंत जगताप यांना आदर्श माता - पिता पुरस्कार, नांदेड फाटा, पुणे येथील परिवर्तन संस्था व सासवड येथील अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आदर्श सामाजिक संस्था, दिवे येथील जीवनवर्धिनी निवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब झेंडे आणि सासवड येथील कन्या प्रशालेचे शिक्षक ईस्माइल सय्यद यांना गुणवंत शिक्षक, सासवड येथील कुस्तीपटू ऋतुजा मुळीक हिला क्रीडागौरव आणि पुरंदर तालुक्यातील समस्त ग्रामस्थ मावडी सुपेला आदर्श ग्राम व्यवस्था पुरस्काराने डॉ. आमटे दाम्पत्याच्या हस्ते सन्मानित केला. देवा झिंजाड यांनी सूत्रसंचालन केले. वामनराव जगताप यांनी आभार मानले.
(वार्ताहर)