असाध्य आजारावरील उपचारासाठी मदत
By admin | Published: May 30, 2016 01:18 AM2016-05-30T01:18:50+5:302016-05-30T01:18:50+5:30
असाध्य आजारांवर महापौर निधीतून २५ ते ५० हजार रुपयांची मदत उपलब्ध होणार आहे.
पुणे : कॅन्सर, किडनीरोपण, हृदयशस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, दृष्टीपटल दोष अशा असाध्य आजारांवर महापौर निधीतून २५ ते ५० हजार रुपयांची मदत उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून, येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
असाध्य आजारांवर उपचारासाठी यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत रुग्णांना किडनीरोपणसाठी प्रत्येकी २५ हजार, कॅन्सरसाठी ५० हजार,र् ैहृदयविकार (बायपास) शस्त्रक्रियेसाठी ३० हजार, एन्जोप्लास्टी १५ हजार आणि दृष्टीपटल दोष निवारणासाठी ५० हजार अशी मदत देण्यात येणार आहे.
शहरी गरीब योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी असलेल्या अटी व शर्ती या योजनेसाठीही लागू राहणार आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मदतीचा धनादेश रुग्णांच्या नावे न देता थेट रुग्णालयाच्या नावे दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
या मदतीसाठी महापौर कार्यालयाकडून शिफारस केल्यानंतर आरोग्य विभागाकडून मदत दिली जाणार आहे. मदतीच्या अर्जासोबत त्याबाबतच्या खर्चाचे एस्टीमेट रुग्णांना द्यावे लागणार आहे. महापौर निधीतून दिल्या जाणाऱ्या या मदतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, त्यापैकी १ कोटी रुपयांचा निधी किडनीरोपणासाठी वापरता येणार आहे. त्यामध्ये प्रत्येकी २५ हजार अशी ४०० रुग्णांना किडनीरोपणासाठी मदत मिळणार आहे. हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी पावणे दोन कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला असून, त्यामधून ५८३ रुग्णांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. एन्जोप्लास्टीसाठी ५० लाखांचा निधी असून, त्यातून ३३३ रुग्णांना प्रत्येकी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. दृष्टीपटलदोषासाठी २५ लाखांची तरतूद असून, त्यामधून ५० रुग्णांना प्रत्येकी ५० हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे.