मध्यरात्री बेवारस रुग्णाला साेडण्यास केली मदत; ससूनमधील आणखी एक डॉक्टर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:12 PM2024-07-31T12:12:08+5:302024-07-31T12:12:36+5:30
सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर डॉक्टरांसह रुग्णाला इमारतीच्या बाहेर घेऊन जात असल्याचे आढळून आले
पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बेवारस रुग्णाला डिस्चार्ज न देता मध्यरात्री येरवडा मनाेरुग्णालयाच्या परिसरात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समाेर आला. या प्रकरणी ससून प्रशासनाने आणखी एका डाॅक्टरला निलंबित केले आहे. यापूर्वी निलंबित केलेल्या डॉक्टरला मदत केल्याचे चाैकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. एकनाथ पवार यांनी ही कारवाई केली आहे.
ससून रुग्णालयातील अस्थिराेग विभागातील एका ३२ वर्षीय बेवारस रुग्णाला २२ जुलै रोजी मध्यरात्री बाहेर साेडले हाेते. यावर तत्काळ कारवाई म्हणून आधी कनिष्ठ निवासी डाॅ. आदी कुमार याला निलंबित केले हाेते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससूनच्या अधिष्ठात्याने चौकशी समिती स्थापन केली हाेती. त्याचा अहवाल आल्यानंतर दुसऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना आता पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच दोन्ही निवासी डॉक्टरांना एका शैक्षणिक टर्मसाठी कॉलेज आणि वसतिगृहातून काढून टाकण्याची शिफारसही कॉलेजने केली आहे.
हा डॉक्टरदेखील ऑर्थोपेडिक विभागातील प्रथम वर्षाचा कनिष्ठ निवासी डाॅक्टर आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर डॉक्टरांसह रुग्णाला इमारतीच्या बाहेर घेऊन जात असल्याचे आढळून आले. परिचारिका कर्मचाऱ्यांसह इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांचा या घटनेत सहभाग असल्याचे आढळून आले नाही. अस्थिराेग विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांनी त्यांना या घटनेची माहिती नव्हती, असे कारणे दाखवा नाेटिसीला उत्तर दिलेले आहे. तसेच त्यांचा या प्रकरणात सहभाग आढळून आलेला नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अंतर्गत समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे आणखी एका कनिष्ठ निवासी डाॅक्टरने बेवारस रुग्णाला बाहेर काढण्यास मदत केल्याचे आढळून आले आहे. त्यावरून त्याला निलंबित करून पुढील सूचना मिळेपर्यंत शैक्षणिक उपक्रमातूनही निलंबित केले आहे. तसेच दोन्ही डॉक्टरांना वसतिगृहातून आणि महाविद्यालयातून एका टर्मसाठी काढून टाकण्याचा निर्णय झाला असून, तसा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभाग, संचालक आणि आयुक्तांना पाठवला आहे. - डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून