साधेपणाने लग्न करून शेतकऱ्यांना मदत
By Admin | Published: December 22, 2016 02:50 AM2016-12-22T02:50:14+5:302016-12-22T02:50:14+5:30
मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही.
पुणे : मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही. मात्र, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश
झगडे यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
झगडे यांनी आपली कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल भालिंगे यांच्या विवाहाच्या खर्चांत बचत करून हा निधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.
राज्यात विविध ठिकाणी झगडे यांनी कामाचा नेहमीच वेगळा ठसा उमटवला आहे. आता त्यांनी अधिकाऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. (प्रतिनिधी)
महेश झगडे यांची कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल यांचा शुभविवाह २० डिसेंबर रोजी केवळ दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत साधेपणाने झाला. लग्नात कोणत्याही स्वरूपाचा डामडौल न करता हा विवाह पार पडला. यामुळे विवाहासाठी होणाऱ्या खर्चात बचत झाली. बचत झालेली ही रक्कम दोन्ही कुटुंबीयांनी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, झगडे यांच्यासह नवदाम्पत्याने या निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सपूर्त केला.