'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' ट्रस्टचा मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:35 PM2020-04-14T18:35:14+5:302020-04-14T18:38:07+5:30
अन्नधान्य वितरण, रूग्णालयातील हजारोंची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेला शिधा वाटप
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने, कोरोना विषाणूच्या प्रादुभावार्मुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गरजू नागरिक, संस्था, रुग्णालयांना मदतीचा हात दिला आहे. अन्नधान्य वितरण, रूग्णालयातील हजारोंची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेला शिधा वाटप आदी उपक्रम ट्रस्टच्यावतीने राबविण्यात येत आहेत.
याबाबत ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी लोकमत सांगितले की, सन २०१३ पासून जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयात अडीच हजार जणांची दोन्ही वेळची भोजनाची विनामूल्य सोय ट्रस्टतर्फे करण्यात येते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये ५० आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) आणि १०० आयसोलेशन बेड तयार करण्यात येत आहेत. तेथील रुग्ण व त्यांचे नातेवाईक मिळून अशा सुमारे ४ हजार जणांची दोन्ही वेळची विनामूल्य भोजन व्यवस्था आता करण्यात आली आहे़.
याचबरोबर अनाथ मुलांची संस्था असलेल्या श्रीवत्सला धान्यरुपी मदत, कासेवाडी वसाहतीतील १ हजार कुटुंंबांचा स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याकरीता ५ हजार साबणांचे वाटप करण्यात आले आहे़. कोरोनामुळे ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता ६ रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. पुणे शहराकरीता या ६ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी परिसरात राहणा-या १०० हून अधिक तृतीयपंथीयांना १ महिना पुरेल इतकी धान्याची मदत ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे़. लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असलेल्या शहरातील तसेच उपनगरातील झोपडपट्टी परिसरातील गरजू कुटुंबांना तब्बल एक महिना पुरेल इतकी धान्यरुपी मदत देण्यात आली आहे़.
याचबरोबर खेड-शिवापूर, पौड, सोमाटणे फाटा, खामगाव, खडकवासला परिसरातील ग्रामीण भागातील वाड्यावस्तयांवरील सुमारे ६०० आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबांनाही एक महिना पुरेल एवढा अन्यधान्य साठा तसेच गोखलेनगर जनवाडी परिसरातील घरकाम व धुणे-भांडी करणाऱ्या गरजू उपेक्षित २५० ते ३०० महिलांसह कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात आले असल्याचेही सुर्यवंशी यांनी सांगितले़.