ललित पाटीलला पळून जाण्यात मदत, सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र
By नम्रता फडणीस | Published: December 5, 2023 07:24 PM2023-12-05T19:24:39+5:302023-12-05T19:24:48+5:30
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणातला सहभाग समोर आल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी या सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पुणे: विनय अऱ्हानाच्या सांगण्यावरून दत्तात्रय ढोके याने ललित पाटील हा कैदी वॉर्डातून पळून गेल्यानंतर त्याला १० हजार रुपये रोख देऊन मोबाइल फोन दिला होता तसेच भूषण हा भाऊ ललित आणि अभिषेक बलकवडे या दोघांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे. पळून गेल्यानंतर ललित नाशिकला पोहोचला होता आणि अर्चना निकमच्या निवासस्थानी थांबला. प्रज्ञा कांबळे ही पाटील याच्याशी दूरध्वनीवरून संपर्कात होती. पाटील याने नाशिकला आल्यावर प्रज्ञा कांबळेला मोठी रक्कम दिली होती, या सर्व गोष्टी पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत. या आरोपींचा ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणातला सहभाग समोर आल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी या सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दत्तात्रय ढोके (वय ४०, रा. हडपसर), अर्चना निकम (वय ३३), प्रज्ञा कांबळे (वय ३९), भूषण पाटील (वय ३४, ), अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (वय ५०, रा. कॅम्प) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अन्य आठ आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ (८) अन्वये तपास सुरू ठेवण्यात येणार असून, तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 223 (सरकारी कर्मचाऱ्याला बेदरकारपणे कैदेतून किंवा कोठडीतून पळून जाणे), 224, 225 (एखाद्या व्यक्तीने दुस-या व्यक्तीला कायदेशीर अटक करण्यास विरोध करणे), 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) आणि 34 (समान हेतू) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.
चाकण येथे २० कोटी रुपयांच्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातील कैदी वॉर्डमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी पाटील याला बेंगळुरूपासून १०० किलोमीटर अंतरावरील एका भोजनालयातून १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा अटक केली. पाटील याला तळोजा कारागृहातून ३१ ऑक्टोबर रोजी पुणे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर पाटील रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्यात सहा आरोपींचा सहभाग असल्याचे दाखवण्यासाठी आम्ही कट रचण्याचे पुरावे आणि डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. सरकारी वकील, तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या छाननी समितीने पळून जाण्याच्या प्रकरणातील पुराव्यांची छाननी केली. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.