आंबेगाव तालुक्यात लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने ‘मदत कक्ष’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:01+5:302021-03-22T04:10:01+5:30
आंबेगाव तालुक्यातील मंचर व घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणि महाळुंगे पडवळ, पेठ, धामणी, निरगुडसर, डिंभे खुर्द, तळेघर, अडिवरे येथील ...
आंबेगाव तालुक्यातील मंचर व घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणि महाळुंगे पडवळ, पेठ, धामणी, निरगुडसर, डिंभे खुर्द, तळेघर, अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत मिळत असून खासगी दवाखान्यांमध्ये याची किंमत २५० रुपये आहे. रुग्णालयांत नागरिक व फ्रंटलाइन वर्कर्सची लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने रुग्णालयाचे व्यवस्थापन कोलमडत आहे. को-विन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे काही ज्येष्ठांना शक्य होत नाही. तांत्रिक गोष्टींची अडचण येत असल्यामुळे नोंदणी झाली आहे की नाही याबद्दलही बऱ्याच जणांना समजत नसल्याने लसीकरण ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ‘लसीकरण मदत कक्ष’ सुरू करण्यात आले आहे. शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांची मदत घेतली जात आहे.
महाळुंगे पडवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष थोरात, युवराज आवटे, समुदाय आरोग्य अधिकारी जयसिंग मिरपागर, आरोग्य पर्यवेक्षक एल. डी. भागवत, आरोग्यसेवक कैलास बोऱ्हाडे, नामदेव मराडे, करण परदेशी, प्रशांत पिंगळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी केंद्रावर कार्यरत असून हे कर्मचारी लसीकरणासाठी आलेल्यांची नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे, टोकन नंबर देणे, लसीकरण मार्गदर्शन, गर्दीचे व्यवस्थापन करत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार पवार, डॉ.क्षितिजा शिंदे, डॉ.अश्विनी गिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका सरिता पडवळ, अर्चना निंबाळकर, क्षितिजा शिंदे नागरिकांना लसीकरण करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन,लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी व मानसिक आधार देण्याचे काम या ठिकाणी करत आहे.येथील योग्य व्यवस्थापणामुळे या मदत कक्षाचा ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच उपयोग होत आहे.
“लसीकरणासाठी सरकारच्या कोविन ॲपवर ऑनलाईन नोंदणी करणेसाठी ज्येष्ठांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स,पासपोर्ट,पेन्शन पासबुक,मतदान कार्ड यापैकी एक पुरावा,मास्क व मोबाईल नंबर सोबत आणावा.सोशल डिस्टन्स ठेवावा.लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी यावे.उपाशीपोटी येऊ नये.”
- संतोष थोरात.(प्राथमिक शिक्षक,मदत कक्ष कर्मचारी,प्रा.आरोग्य केंद्र,महाळुंगे पडवळ)
“कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी आहे.ज्येष्ठ नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता लसीकरण करून स्वतःला व आपल्या परिवाराला कोरोना संक्रमणापासून सुरक्षित ठेवावे. मदत कक्षामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन वारंवार हेलपाटे मारण्याचाही त्रास कमी झाला”.
-बबन गणपत पडवळ, ज्येष्ठ नागरिक, विकासवाडी (महाळुंगे पडवळ)
महाळुंगे पडवळ(ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदत कक्ष ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार ठरत आहे.