हेमाडपंती मंदिर पाण्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:28 AM2018-05-18T01:28:15+5:302018-05-18T01:28:15+5:30

उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने पळसदेव येथील हेमाडपंती मंदिरांचे दर्शन होऊ लागले आहे.

Hemadpanti Temple Outside Water | हेमाडपंती मंदिर पाण्याबाहेर

हेमाडपंती मंदिर पाण्याबाहेर

googlenewsNext

न्हावी : उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने पळसदेव येथील हेमाडपंती मंदिरांचे दर्शन होऊ लागले आहे. पळसदेव गावच्या वैभवात भर घालणाऱ्या प्राचीन हेमाडपंती दगडी मंदिराची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी उजनी धरण भरल्यानंतर पाण्याखाली जाणारे हे मंदिर उन्हाळ्यात पूर्णपणे उघडे पडते.
या मंदिराच्या दगडांवर विविध प्रकारची शिल्पे साकारण्यात आली असल्याने मंदिर आकर्षक वाटते. रामायमाची माहिती सांगणारी ही शिल्पे असल्याने, पुरातन काळातील हा दुर्मिळ ठेवा जतन करण्याची गरज असल्याचे जाणकारातून बोलले जाते. भीमा नदीतीरावर वसलेल्या पळसदेव गावाचे सन १९७६मध्ये उजनी धरणामुळे पुनर्वसन झाले. नदीच्या काठावरील या गावाचा प्रमुख व्यवसाय शेती होता. धरण बांधणीनंतर ग्रामस्थांचे गावालगतच्या टेकडीवर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाले खरे, मात्र ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, घरे, मंदिरे आहे त्या स्थितीत सोडून दिले. केवळ ग्रामदैवत पळसनाथाच्या मंदिराचे स्थलांतर करण्यात आले.
जुन्या मंदिरातील महादेवाची पिंड नवीन मंदिरात स्थापन करण्यात आली. तर हे जुने दगडी मंदिर मात्र आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले. गेल्या साडेतीन शतकांचा कालावधी उलटला तरी मंदिराने आपले अस्तित्व टिकवले आहे. काही ठिकाणी मंदिराची पडझड झाली आहे. अनेक दुर्मिळ शिल्पे खाली पडलेली आहेत. काही शिल्पांचे तुकडे झाले आहेत. तुकडे झालेले शिल्प (दगड) येथील नागरिक घरे बांधण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर भरुन नेताना दिसत होते. प्राचीन काळातील स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचा दाखला देणाºया या मंदिराचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या माध्यमातून हा प्राचीन वारसा जपण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तसेच त्याचे पावित्र्य जपण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Hemadpanti Temple Outside Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.