Kasba By Election: हेमंत रासनेंना स्वतःच्या प्रभागात आघाडी मिळाली होती; तरीही रवीभाऊंचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 02:41 PM2023-03-02T14:41:16+5:302023-03-02T14:44:58+5:30
कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. कसब्यात कमळ कोमजले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल उधळला.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विशेष करून प्रभाग क्रमांक १५ मध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी झाल्यावरही देखील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतला. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे वंसत थाेरात यांनी भाजपचे गिरीश बापट यांचा पराभव केला होता. पोटनिवडणुकीतील इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तीस वर्षानंतर कसब्यामध्ये इतिहास घडला आहे.
महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी,उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यासह मित्र पक्षांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव झाला. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अत्यंत जोरदार केला.