पुणे महापालिकेवर कसब्याचे वर्चस्व ; धीरज घाटे सभागृहनेते, हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 03:20 PM2019-12-03T15:20:03+5:302019-12-03T15:23:25+5:30
पुणे महापालिकेत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व दिसून आले असून भाजपने सभागृहनेते पदी धीरज घाटे तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड केली आहे.
पुणे : पुणे महापालिकेत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व दिसून आले असून भाजपने सभागृहनेते पदी धीरज घाटे तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड केली आहे.
आरक्षण बदलल्यावर मुरलीधर मोहोळ यांची महापौर पदावर निवड करण्यात आली. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांनाही पक्षाने राजीनामे देण्यास सांगितले. त्यानुसार सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि नुकतेच आमदार झालेले स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी राजीनामे दिले. त्यानंतर घाटे आणि रासने यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या रूपाने पुन्हा एकदा कसबा भागातला नेतृत्व करायची संधी मिळाली आहे.
दरम्यान घाटे हे भाजपचे आक्रमक सभासद म्हणून ओळखले जातात. सभागृहात अतिशय स्पष्ट मांडणी करणारे घाटे अत्यंत कमी वयापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. गिरीश बापट खासदार झाल्यावर त्यांनी आमदारकी लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिली. अखेर घाटे यांना सभागृहनेते पदी बढती देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे रासने काहीसे मवाळ असले तरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या माध्यमातून त्यांच्यामागे मोठी युवा आणि व्यापारी वर्ग आहे. भाजपचे ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांनाच स्थायी समितीवर संधी मिळेल असे अपेक्षित होते. भाजपने महापौरपद एकच वर्षांचे असेल असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे कदाचित ही पदे'देखील एकाच वर्षापुरती असू शकतात. मात्र पूर्वी देशात आणि राज्यातही भाजप सरकार असल्यामुळे निर्धास्त असणारे सभासद आता बदललेल्या परिस्थितीमुळे कसे काम करतात आणि शहराच्या विकासात त्याचा काही फरक पडतो का हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.