हवेलीच्या सभापतिपदी हेमलता काळोखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:59 AM2018-06-15T02:59:58+5:302018-06-15T02:59:58+5:30
हवेलीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्याने बंडखोरी करीत भाजपा-शिवसेनेच्या मदतीने पक्षाला आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर मिळाला.
कदमवाकवस्ती - हवेलीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्याने बंडखोरी करीत भाजपा-शिवसेनेच्या मदतीने पक्षाला आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर मिळाला. या राजकीय घडामोडींमुळे रोमहर्षक ठरलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार हेमलता कांतिलाल काळोखे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार कावेरी विलास कुंजीर यांचा चिठ्ठीने पराभव करीत सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत.
हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (दि.१४) येथील सभागृहात पार पडली. हवेली उपविभागीय महसूल अधिकारी ज्योती कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून हेमलता कांतिलाल काळोखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, अनपेक्षितपणे सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या सदस्या कावेरी विलास कुंजीर यांनी बंडखोरी करीत सभापतिपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला; तसेच भाजपाकडून सभापतिपदासाठी अश्विनी किशोर पोकळे यांनी, तर शिवसेनेकडून ललिता अनिल कुटे यांनी अर्ज दाखल केले होते; परंतु निर्धारित वेळेत ललिता कुटे यांनी अर्ज माघारी घेतल्याने सभापतिपदासाठी हेमलता काळोखे, कावेरी कुंजीर व अश्विनी पोकळे यांचे अर्ज कायम राहून निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी सभापतिपदासाठी निर्णायक युती झालेल्या भाजपा -शिवसेनेने राष्ट्रवादी बंडखोर कावेरी कुंजीर यांना पाठिंबा देऊन चाल खेळली. सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत आवाजी मतदानाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमलता काळोखे यांना १०, तर बंडखोर कावेरी कुंजीर यांना १० मते मिळाली, तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना शून्य मते मिळाली. हेमलता काळोखे व कावेरी कुंजीर प्रत्येकी समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे सभापती निवडण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी घेतला. या निर्णायक कौलात हेमलता कोळोखे यांना नशीबाने साथ दिल्याने त्यांची सभापतिपदी निवडीची अधिकृत घोषणा झाली.
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
चिठ्ठी विरोधात गेल्याने भाजपा - सेनेला बंडखोराला पाठिंबा देऊन पंचायत समितीची सत्ता स्थापन करण्यावर पाणी फिरले आहे. सभापतिपदाची निर्णायक चिठ्ठीने साथ दिल्याने राष्ट्रवादीला आपली पत टिकविण्यात यश आले आहे. अचानक घडलेल्या निर्णायक कलाटणींनी निकालाची प्रचंड उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. नूतन सभापती हेमलता काळोखे या देहू गणातून निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यादींनी हेमलता काळोखे यांचा सत्कार केला.