हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे ४० टक्के पुणेकर त्रस्त; अॅनेमियाबाबत भारताचे स्थान तळाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:16 PM2018-02-09T13:16:45+5:302018-02-09T13:28:58+5:30
पुणेकरांमध्ये १० पैकी ४ जणांना अनियमित हिमोग्लोबीनचा त्रास असल्याचे नुकत्याच झालेल्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.
पुणे : सकस आहाराची कमतरता, धकाधकीचे जीवन, आरोग्य समस्यांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे हिमोग्लोबीनच्या कमतरतेचा सामना अनेकांना करावा लागतो. शरीरातील लोह कमी झाले, की हिमोग्लोबीनची कमतरता जाणवते. त्यामुळे थकवा येणे, भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. पुणेकरांमध्ये १० पैकी ४ जणांना अनियमित हिमोग्लोबीनचा त्रास असल्याचे नुकत्याच झालेल्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.
आरोग्य सर्वेक्षणामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळेत ० ते ८० वयोगटातील लोकांचे २०१३ ते २०१७ या ५ वर्षांच्या काळात ६,५९,३५३ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३९ टक्के नमुन्यांमध्ये हिमोग्लोबीनची पातळी अनियमित दिसून आली. ३०-४० वर्षे वयोगटात हिमोग्लोबीनची अनियमित पातळी सर्वांत जास्त म्हणजे १७ टक्क्यांपेक्षा जास्त दिसून आली. २०-३० वर्षे वयोगटात यानंतर ही पातळी १४ टक्क्क्यांहून अधिक दिसून आली. ०-१० वर्षे वयोगटातील २८,८१३ नमुने तपासण्यात आले. यातील ६५ टक्के नमुने अनियमित असल्याचे दिसून आले, अशी माहिती पुण्यातील एका पॅथॉलॉजी लॅबने केलेल्या अभ्यासात पुढे आली आहे. जागतिक पोषणमूल्य अहवालात २०१७मध्ये अॅनेमियाबाबत भारताचे स्थान तळाशी दाखवण्यात आले आहे.
हिमोग्लोबीनची पातळी वाढविण्यासाठी लाल पेशींचे घटलेले उत्पादन, रक्तपेशीच्या नाशात झालेली वाढ आणि रक्त कमी होणे आदी निकषांचा अभ्यास केला जातो. कमी हिमोग्लोबीनच्या पातळीला अनुसरून ते वाढविण्यासाठी कोणती पद्धत वापरावी, हे ठरवले जाते. लाल पेशी संक्रमित करणे, इरिथ्रोप्रोटीन प्राप्त करणे, सप्लिमेंट्स घेणे, लोहयुक्त आणि जीवनसत्त्वांचा समावेश असलेले अन्न हिमोग्लोबीनची पातळी राखण्यासाठी आवश्यक आहे.
- डॉ. सुशील शहा
अॅनेमियाचा शोध घेण्यासाठी महिलांनी रक्ताची नियमित चाचणी करणे आणि योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. गर्भधारणा होण्याच्या वयात अॅनेमियाचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात,
असे डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वयोगट | अनियमित | सामान्य | एकूण |
०-१० | १८,८६२ | ९९५१ | २८८१३ |
१०-२० | १३,४५० | ३८,९१० | ५२,३६० |
२०-३० | ३६,२४९ | ८४,३३५ | १,२०,५८४ |
३०-४० | ४४,२६१ | ८५,९१६ | १,३०,१७७ |
४०-५० | ३१,७३४ | ५८,२४१ | ८९,९७५ |
५०-६० | ३०,३५२ | ५१,९९४ | ८२,३४६ |
६०-७० | ४२,८७४ | ४५,७७३ | ८८,६४७ |
७०-८० | २९,५४५ | २०,५२३ | ५०,०६८ |
८० आणि वर | ११,१६१ | ५२२२ | १६,३८३ |
एकूण | २,५८,४८८ | ४,००,८६५ | ६,५९,३५३ |