...म्हणून अमॅनोरा प्रशासनाला पोलिसांनी पाठवली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:28 PM2018-04-02T16:28:37+5:302018-04-02T16:34:37+5:30
अमॅनोरा सिटीत वाहने चालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन न चालविण्याच्या सूचना सिटी प्रशासनाच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र तरीही काही हट्टी चालक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रशासनाने शक्कल लढवत नेहमी बसविण्यात येणाऱ्या रम्बलर स्पीडब्रेकरला धारदार लोखंडी आरे असलेली पट्टी अर्थात टायर किलर लावले होते.
पुणे : अमॅनोरा पार्क सिटीतील लोकांनी व्हाट्स ऍपच्या माध्यमातून तक्रारी केल्यामुळे अमॅनोरा पार्क सिटीत लावण्यात आलेले 'टायर किलर' काढण्याची नोटीस दिली असल्याचे हडपसर वाहतूक पोलिसांच्यामार्फत सांगण्यात आले आहे. अमॅनोरा सिटीत वाहने चालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन न चालविण्याच्या सूचना सिटी प्रशासनाच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र तरीही काही हट्टी चालक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रशासनाने शक्कल लढवत नेहमी बसविण्यात येणाऱ्या रम्बलर स्पीडब्रेकरला धारदार लोखंडी आरे असलेली पट्टी अर्थात टायर किलर लावले होते. त्यामुळे योग्य दिशेने येणाऱ्या गाड्या सुरळीत येऊ शकल्या तरी उलट दिशेने जाणाऱ्या गाड्या मात्र तात्काळ पंक्चर व्हायला लागल्या होत्या . या उपायामुळे बेशिस्त वाहनचालक जागेवर आले असून विरुद्ध दिशेने गाडी चालवण्याचे प्रमाणही कमी झाले होते.
मात्र आता त्यावर हडपसर पोलिसांनी आक्षेप घेतला असून अमॅनोरा प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. हे टायर किलर बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने तातडीने हे टायर किलर हटवावेत असेही यात नमूद केले आहे. त्याबाबदल हडपसर ट्राफिक पोलीस निरीक्षकांनी अमॅनोरा पार्क सिटीत लोकांनी व्हाट्स ऍपच्या माध्यमातून तक्रारी केल्यामुळे नोटीस पाठवल्याचे कारण दिले आहे. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक कळसकर यांनी हा रस्ता खासगी नसून असा बदल करायचा असल्यास परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर या ठिकाणी असलेल्या किलरमध्ये अडकून एखादी गाडी पडल्यास झालेल्या अपघातात प्राणही जाऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ऍमेनोरा प्रशासनाला नोटीस पाठवल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.