...म्हणून कोविशिल्डचे डोस घेणाऱ्यांना युरोपियन देशात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:33+5:302021-06-29T04:09:33+5:30
पुणे : युरोपियन युनियनच्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने ''ग्रीन ट्रॅव्हल पास'' या संकल्पनेवर भर दिला आहे. याअंतर्गत फायझर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनिका ...
पुणे : युरोपियन युनियनच्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने ''ग्रीन ट्रॅव्हल पास'' या संकल्पनेवर भर दिला आहे. याअंतर्गत फायझर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनिका या लसींचे दोन्ही डोस घेतले असतील, तरच त्या व्यक्तींना युरोपात येताना अथवा युरोपमधून इतरत्र जाताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी नियमावली तयार केली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनिका कंपनीतर्फे विकसित केलेल्या लसीचे भारतात सिरम इन्स्टिट्यूटतर्फे ''कोविशिल्ड'' या नावाने उत्पादन केले जात आहे. या लसीला युरोपियन मेडिसिन एजन्सीची मान्यता मिळाली नसल्याने कोविशिल्डचे डोस घेतलेल्याना युरोपियन देशात काही अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी ''लोकमत''ला दिली.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारी याबाबत ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविशिल्ड घेतलेल्या बऱ्याच भारतीयांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना समस्येचा सामना करावा लागत आहे, असे समजते आहे. मी सर्वांना हमी देतो की उच्च स्तरावर बोलणी करून आणि राजनैतिक पातळीवर लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल.''
------
कोविशिल्ड लसीचा डेटा न मिळाल्याने युरोपियन मेडिसिन एजन्सीने परवानगी दिलेली नाही. लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनिका कंपनीने विकसित केली असल्याने त्याच नावाने असलेल्या लसीला मान्यता आहे. कोविशिल्ड घेतलेले विद्यार्थी, डिपेंडंट, पर्यटक यांना अडचणी येत आहेत. १४ दिवस क्वारंटाईन होणे, आरटीपीसीआर टेस्ट करणे ही सर्व प्रक्रिया खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बरेचदा लसीकरण धोरणावर परिणाम दिसून येतो. पुढील काही दिवसांमध्ये यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.
- डॉ. नानासाहेब थोरात