...म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन भारतात मुबलक उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:57 AM2020-04-11T05:57:49+5:302020-04-11T05:58:02+5:30
डॉ. सदानंद बोरसे : औषधाचे नव्हे तर निर्मितीचे पेटंट दिले जात असल्याने इतर देशांच्या तुलनेत किंमत कमी
नेहा सराफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय कायद्यानुसार औषधाचे कोणतेही पेटंट नसून त्याच्या निर्मिती प्रक्रियेचे पेटंट दिले जाते. त्यामुळे या कायदेशीर तरतुदीनुसार भारतीय कंपन्या जगातल्या अनेक आजारांवरील औषधे कमी किमतीत उपलब्ध करून देऊ शकतात. याच कारणामुळे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, अशी माहिती औषध निर्मिती प्रक्रियेचे अभ्यासक डॉ. सदानंद बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १०) दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर निर्णायक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावर लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ गुंतले आहेत. मात्र हे सुरु असताना अमेरिकेने भारतासारख्या विकसनशील देशाकडे केलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या मागणीमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. बलाढ्य अमेरिका स्वत:च हे औषध का बनवत नाही, या मुद्दयावर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. याच विषयावर डॉ. बोरसे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
या औषधाबद्दल बोलायचे झाल्यास काही विशिष्ट प्रकारचे संधिवात आणि मलेरियासाठी क्लोरोक्वीन हे मुख्यत: वापरले जाते. हे औषध कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावकारी असल्याचे अजून तरी निश्चित स्वरूपात पुढे आलेले नाही. कोरोना रुग्णाशी संपर्क असलेले डॉक्टर, नर्स, घरातील व्यक्ती, पोलीस, सफाई कर्मचारी प्रतिबंधक उपाय म्हणून या औषधाचा वापर करू शकतात, अशी सूचना आहे. मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचे सेवन चुकीचे आहे. असे केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात, असा इशाराही डॉ. बोरसे यांनी दिला.
अमेरिकेतील औषध कंपन्या व्यापारी तत्वाला डोळ्यासमोर ठेवून काम करतात. भारतातील औषध निर्मिती कंपन्यांप्रमाणे मानवता, गरजूंना मदत या गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम आहेत. औषध निर्मितीपेक्षा त्यांना भारतासारख्या देशातून औषध आयात करणे कमी खर्चाचे असेल. म्हणून त्यांनी असे केले असावे. त्यांच्या कंपन्यांवर भार न टाकता भारतासारख्या देशाला क्वचित प्रसंगी धमकावून सुद्धा गरजेप्रमाणे पुरवठा मागवू शकतात.
- डॉ. सदानंद बोरसे,
औषध निर्मिती प्रक्रियेचे अभ्यासक