भेसळयुक्त खाद्यामुळे कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:06+5:302021-04-21T04:10:06+5:30
याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद भोंडवे (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचेसमवेत या अर्जावर गिरीश दिगंबर ...
याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद भोंडवे (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचेसमवेत या अर्जावर गिरीश दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे व धनंजय नारायण डांगे यांचेसह २७ स्वाक्षरी केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर याबाबत कंपनीस कळवले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना लक्ष्मण भोंडवे म्हणाले की अंडी देणाऱ्या कोंबड्यांना १०५ दिवसांनंतर सदर खाद्य दिले जाते. त्यानंतर २१ दिवसांनी कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करतात. यापूर्वी याच कंपनीचे खाद्य दिले होते. त्या वेळी कोंबड्या अंडी देत होत्या. परंतु ११ एप्रिल रोजी खरेदी केलेले खाद्य दिल्यानंतर ३ दिवसांनी सुमारे १ लाखापेक्षा जास्त कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले आहे. इतर वेळी उन्हाळ्यात अंडी कमी दरात खपतात. परंतु सध्या कोरोनाच्या महामारीमुळे होलसेल भावात ५ रूपये २० पैसे प्रतिअंड्याला भाव मिळत आहे. सद्य दराचा विचार केला तर आम्हा सर्वांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. तालुक्यातील सर्व पोल्ट्रीचा विचार केला तर हा नुकसानीचा आकडा अब्जावधीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी - सदर प्रकरणी तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या खाद्याचे नमुने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. याचबरोबर नुकसानभरपाईसाठी सदर कंपनी प्रशासनाशी आपण बोलणार असून त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.