भाटनगरात हप्तेवसुली बंद; कारवाई सुरू

By Admin | Published: July 28, 2015 12:50 AM2015-07-28T00:50:22+5:302015-07-28T00:50:22+5:30

एरवी भाटनगरकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना आता भाटनगरकडे लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. ‘लोकमत’ने १६ जुलैपासून हातभट्टी आणि अवैध दारूधंद्यांविरोधात जोरदार मोहीम

Heptavsul shut down in Bhatnagar; Action started | भाटनगरात हप्तेवसुली बंद; कारवाई सुरू

भाटनगरात हप्तेवसुली बंद; कारवाई सुरू

googlenewsNext

पिंपरी : एरवी भाटनगरकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना आता भाटनगरकडे लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. ‘लोकमत’ने १६ जुलैपासून हातभट्टी आणि अवैध दारूधंद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. कारवाई करून पोलीस निघून जाताच, भाटनगरमध्ये हातभट्ट्या लगेच सुरू व्हायच्या. पोलिसांची कारवाई केवळ फार्स ठरायची. आता मात्र पोलीस येथे हप्ता वसुलीसाठी नव्हे, तर कारवाईसाठी येत आहेत.
लोकमतने पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाईची कार्यपद्धती चव्हाट्यावर आणली. त्यामुळे आता भाटनगरमध्ये हातभट्ट्या सुरू होणार नाहीत, याची खबरदारी म्हणून पोलीस रोजच फेरफटका मारू लागले आहेत. आढळून येणाऱ्यांवर कारवाईसुद्धा केली जात आहे.
हातभट्टीचे आगार मानल्या जाणाऱ्या भाटनगरमधील दारूअड्डे कायमचे बंद करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. यापूर्वी पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई नावापुरती करायचे. कठोर कारवाईचे धोरण अवलंबले जात नव्हते. एकदा कारवाई केली की, कित्येक दिवस पोलीस त्या भागात फिरकत नव्हते. लोकमतने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडले आहे. बारा दिवसांपासून पोलिसांनी भाटनगर परिसरातील हातभट्ट्या आणि अड्डे यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. घराघरांत शिरून पोलिसांनी दारू तयार करण्याचे साहित्य, तयार दारूचा साठा नष्ट केला. त्यानंतरही नेहमीची सवय लागलेल्या भाटनगरमधील काही रहिवाशांनी हातभट्टी तयार करून विकणे सुरू केले. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत काही जणांवर गुन्हे दाखल केले. यापूर्वी कारवाईनंतर काही पोलीस यायचे, ते हप्ते वसुलीसाठी. आता परिस्थिती बदलली आहे. पोलीस हप्ते वसुलीला नव्हे, तर कारवाईनंतरही कोणी हातभट्टी तयार करण्याचा, साठा करून विक्रीचा प्रयत्न करीत आहे का, हे पाहण्यासाठी ‘राऊंड’ मारू लागले आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हातभट्टीवाल्यांचे वांदे झाले आहेत.
एखाद दुसरा दिवस वृत्तपत्रांत बातमी येईल, नावापुरती पोलीस कारवाई करतील, पुन्हा जैसे थे परिस्थिती असेल, हा हातभट्टीवाल्यांचा समज लोकमतने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे फोल ठरला आहे. कोणत्याही क्षणी पोलीस येतील, कारवाई करतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. पोलिसांनीही गांभीर्याने दखल घेऊन या भागाकडे लक्ष केंद्रित केल्याने कधी नव्हे एवढी अडचण हातभट्टी व्यावसायिकांपुढे निर्माण झाली आहे.
सोसायट्यांमध्ये राहणारे रहिवाशी अवैध धंद्यांच्या विरोधात तक्रार करणे, समस्या तडीस जाईपर्यंत पाठपुरावा करण्याचे बहुधा टाळतात. कशाला कोणाचा विरोध ओढवून घ्यायचा, अशी त्यांची धारणा असते. लोकमतने अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतल्यामुळे सोसायट्यांमधील नागरिकही तक्रार देण्यास पुढे येऊ लागले आहेत. रहाटणीतील सह्याद्री सहकारी गृहरचना संस्थेतील रहिवाशांनी त्यांच्या सोसायटीजवळ अनंत पार्कच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार पोलिसांना दिली आहे. मद्यविक्रीचा परवाना मिळविला असला, तरी या मद्यविक्री दुकानाला आजूबाजूच्या रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. लोकवस्तीत असलेल्या या दुकानापुढे रोज रात्री मद्यपींचा अड्डा तयार होतो. महिलांना सायंकाळी सहानंतर घराबाहेर पडणे कठीण होते. अनेकदा पोलिसांकडे तक्रार दिली. परंतु, काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी त्यांची व्यथा लोकमतकडे मांडली. (प्रतिनिधी)

हातभट्टीचे रसायन नष्ट
पोलिसांनी रविवारी भाटनगर येथे सुनीता राजू मिनेकर यांच्या घरातून हातभट्टी तयार करण्याचे ७० लिटर रसायन जप्त केले. १२५० रुपयांचा गावठी दारूचा माल जप्त केला. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाटनगर भागात रोजची गस्त सुरू केली आहे. कोणीही पुन्हा हातभट्ट्या सुरू करू नयेत, असे आवाहन केले आहे. आवाहन केल्यानंतरही या भागात छुप्या पद्धतीने दारू तयार करण्याचा, साठा करून विक्रीचा प्रयत्न काही जण करीत होते. त्यांना पोलिसांनी समज दिली आहे. कठोर भूमिका घेऊन कारवाई सुरूच ठेवल्याने येथील परिस्थिती बदलेल, असा विश्वास पोलीस व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: Heptavsul shut down in Bhatnagar; Action started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.