वडिलांच्या आठवणीत ‘तिचा’ विवाह!
By admin | Published: April 22, 2017 03:30 AM2017-04-22T03:30:27+5:302017-04-22T03:30:27+5:30
मागील महिन्यामध्ये दि. १२ मार्च रोजी शेतीचे कर्ज व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न यामुळे तरडोलीनजीक पवारवाडी येथील आत्माराम ज्ञानदेव शेळके
मोरगाव : मागील महिन्यामध्ये दि. १२ मार्च रोजी शेतीचे कर्ज व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न यामुळे तरडोलीनजीक पवारवाडी येथील आत्माराम ज्ञानदेव शेळके या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे शेळके कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र बारामती येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने हा लग्नसोहळा पार करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला असून तालुक्यातील इतर सामाजिक संस्थांसाठी एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली येथील आत्महत्याग्रस्त आत्माराम शेळके यांची मुलगी मोनिका व पवारवाडी येथीलच अप्पासोा पवार यांचा मुलगा विकास यांचा विवाह पवारवाडी येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर झाला. या लग्न सोहळ्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने मांडव, दिवाण संसारोपयोगी प्रत्येकी पाच पाच भांड्यांचा संच, पिण्याचे पाणी, पत्रावळी आदी खर्च लग्नासाठी केला आहे. लग्न दिमाखात पार पाडले. अगदी जेवणाचा खर्च व अन्न तयार करण्यासाठी आचारीही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला होता. प्रतिष्ठानने केलेल्या या खर्चामुळे शेळके कुटुंबीयांच्या भावनांना
बांध फुटला. शेळके यांच्या नातेवाईकांनीही कूलर, फ्रीज, सोफा आदी वस्तू मोनिकाच्या लग्नानिमित्त आंदन केल्या. समाजातील अशा संस्था पुढे आल्यास राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, असे मत मुलीचे चुलते रावसाहेब शेळके व मुलीची आई आनंदाबाई यांनी व्यक्त केले.
लग्न सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, शरयू फाउंडेशनच्या शर्मिला पवार, सनी देवकाते, तरडोलीच्या सरपंच गौरी शिंदे, उपसरपंच संजय भापकर, हनुमंत भापकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लग्नानंतर शर्मिला पवार यांनी दहा हजार रुपयांची मदत शेळके परिवाराला केली. (वार्ताहर)
...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील
आयुष्याचा साथीदार शोधल्यानंतर समाजातील तरुण मुलांनी लग्नात कुठलीही अपेक्षा न धरता हुंडा न घेता लग्न केल्यास बारामती तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, असे विकास अप्पासाहेब पवार यांनी सांगितले.