कंपनीच्या मोकळ्या आवारातून वनौषधींचे ऊत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:43+5:302020-12-27T04:08:43+5:30

राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एखाद्या कंपनीचे मोकळे आवार म्हणजे एरवी नको असलेले साहित्य टाकण्याची जागा किंवा ...

Herbal origin from the company's open space | कंपनीच्या मोकळ्या आवारातून वनौषधींचे ऊत्पन्न

कंपनीच्या मोकळ्या आवारातून वनौषधींचे ऊत्पन्न

Next

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एखाद्या कंपनीचे मोकळे आवार म्हणजे एरवी नको असलेले साहित्य टाकण्याची जागा किंवा फार झाले तर वाहनतळ वगैरे. एका कंपनीच्या चालकाने मात्र या मोकळ्या आवाराचा हौसेला कल्पकतेची जोड देत वनौषधी लागवडीसाठी उपयोग केला व आता त्यापासून उत्पन्नही मिळू लागले आहे.

मुळशी तालुक्यातील भरे गावात ही कंपनी आहे. श्रीकांत व शुभांगी आचार्य ही कंपनी चालवतात. त्यांच्या कंपनीच्या आवारात मोकळी जागा होती. त्याचा काहीच वापर होत नव्हता. दोघांनीही काही वर्षांपुर्वी त्या जागेवर झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. झाडेच लावायची तर मग ती उपयोगी असलेली का नको याविचाराने त्यांनी काही तज्ज्ञ व्यक्तींबरोबर चर्चा करून वनौषधींची लागवड करण्याचे ठरवले.

बेहडा, हिरडा, अश्वगंधा, अडूळसा, बिब्बा, शतावरी, अशोक अशी प्रत्येकी २, ३ झाडांची लागवड त्यांनी केली. आता ही झाडे चांगली वाढली आहेत. यावर्षी त्यांनी एका झाडाचा बेहडा काढला. तो निघाला २५ किलो. हा औषधी आहे. वैद्यांकडे तो ६०० रूपये किलोने विक्री करतात. त्याचा घाऊक दर ३०० रूपये किलोपेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा कमी दराने विक्री केली तरीही ६ हजार रुपये मिळतीलच असा आचार्य यांना विश्वास आहे. हे एका झाडाचे. दोन झाडांचे वर्षाला १२ हजार रूपये. याचप्रमाणे अन्य औषधी झाडांपासूनही नक्की उत्पन्न मिळणार याची त्यांनी खात्री आहे.

पैसे महत्वाचे नाही तर थोडा विचार केला, कष्ट केले तर निसर्ग कधीही आपले हात रिकामे राहू देत नाही असे आचार्य यांचे म्हणणे आहे. परदेशी वृक्ष लावण्याचे बंद होऊन रिकामी जागा असलेल्यांनी अशा वृक्षांची लागवड करावी असे ते म्हणाले. ३६५ दिवस सूर्यप्रकाश, तीन प्रकारचे हवामान, पाण्याची भरपूर उपलब्धता हे भारतीय निसर्गाचे जगात कुठेही नसलेली वैशिष्ट्य आहे व आपण त्याचा भरपूर वापर करायला हवा. एकदा झाड लावले की ते तग धरेपर्यंत त्याकडे लक्ष द्यावे लागते, नंतर त्याचे ते आपोआप वाढते व थंड सावलीसह अनेक गोष्टी देते असा अनुभवही त्यांनी सांगितला.

कंपनीतील ही मोकळी, ओसाड असलेली जागा आता हिरवीगार झाली आहे. आणखी काही जागा होती तिथेही त्यांनी आता चिकू, पेरू, पपई, याबरोबरच आंबा, जांभूळ असे मोठे वृक्षही लावले आहेत. मोकळी जागा असलेल्या प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे.

Web Title: Herbal origin from the company's open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.