असे असतात शिक्षक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:55+5:302021-07-16T04:08:55+5:30

काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, "गजू, ...

Here are the teachers ... | असे असतात शिक्षक...

असे असतात शिक्षक...

Next

काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, "गजू, तुझ्या हातात कला आहे. तू असं का कर. नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबूट ठेवले तर गिऱ्हाइकांना थांबावं लागणार नाही" " सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ" "हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यांत परत करायचे. चालेल?" गजू तयार झाला. आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहिली. महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. जोशी सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले. "मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर. गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला. सहा महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता. "सर खूप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं" "गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो! स्माॅल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एमआयडीसीमध्ये फॅक्टरी टाकून दे" "काय? फॅक्टरी?" गजू थरारला " सर मला जमेल का?" "सगळं जमेल. मी आहे ना" सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.

"सर खूप करताय माझ्यासाठी" "अरे ते माझं कर्तव्यच आहे" त्याला उठवत ते म्हणाले" माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत. तूच एकटा मागे राहावा हे मला कसं पटावं?" गजूच्या डोळ्यांत पाणी आलं. दोन वर्षांत गजू खूप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची तीन दुकानं झाली. गजूचा गजाननशेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहायला गेला. भाऊबहिणी चांगल्या शाळा काॅलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली. इकडे जोशी सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थकले होते. त्यांच्या मुलाने इंग्लंडमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच आॅस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची. एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांची मुलगा, मुलगी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच, शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला. सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खूप आग्रह केला, पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं. ते गजूला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता. एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहोचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं. "सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल?" "अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खूप मोठा झालाय. बरं ठीक आहे सांग. तुला काय मदत हवी आहे?" "सर माझे वडील व्हाल?" सर स्तब्ध झाले. मग म्हणाले "अरे वेड्या, मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय." "तर मग मला मुलाचं कर्तव्य करू द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे." गजू हात जोडत म्हणाला. "अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?" "सर तिला विचारूनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!" "बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल. "मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. सर तो सारासार विचार करूनच मी आलोय." सर विचारात पडले. मग म्हणाले, "ठीक आहे येतो मी, पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही" "मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो. तुम्हालाही तेच म्हणेन." सर मोकळेपणाने हसले. "अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजाननशेठ व्हायला मला मदत करायची. गजूला गहिवरून आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते. असे असतात शिक्षक...

Web Title: Here are the teachers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.