बोले तो पुणेकर ! जाणून घ्या भन्नाट पुणेरी मराठी शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 08:01 PM2018-04-04T20:01:35+5:302018-04-04T20:01:35+5:30
बोलण्यात पुणेकर कोणालाही हार जाणार नाहीत असं म्हटलं जात. पुणेकरांच्या परखड बोलण्याविषयी वेगवेगळी मते असली तरी पुण्याने स्वतःचे असे काही शब्द तयार केले आहेत. जाणून घ्या काही खास पुणेरी शब्
पुणे : पुणेकर त्यांच्या भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच तरुणाईने काही नवे शब्द रूढ केले आहेत. जाणून घ्या असेच काही भन्नाट मराठी शब्द आणि त्यांचे अर्थ
वाढीव :
वाढीव म्हणजे अधिकचे. साध्या अर्थाने घ्यायचे झाल्यास एखादी गोष्ट उत्तम आहे सांगण्यासाठी वाढीव शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ काय वाढीव काम केलंय त्याने सिनेमात. पण हाच शब्द विक्षिप्तपणा दाखवण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, ती व्यक्ती नको रे सोबत, जाम वाढीव आहे.
भारीच किंवा लई भारी :
लई भारी सिनेमा असला तरी त्यापेक्षाही आधी पुण्यात लई भारी शब्द रूढ झाला आहे. अगदी साध्या सिनेमालाही लई भारी सिनेमा होता अशी दाद दिली जाते. लई भारी सोबत 'भारीच' हा शब्द पण वापरला जातो. त्यातही फक्त 'भारीच' शब्दावर जोर दिला जातो.
'य' :
असा कसा शब्द असू शकतो? एका अक्षरातून काय समजणार असा प्रश्न पडला असेल तर पुण्यात खूपवेळा किंवा असंख्यवेळा असा संख्यात्मक अर्थासाठी हे अक्षर वापरतात. उदाहरणार्थ, मी 'य' बघितला आहे हा सिनेमा.
आवरा :
पसारा किंवा घर आवरणे सगळ्यांना माहिती आहेच. पण आमचे पुणेकर नावडती कृती थांबवण्यासाठी आवरा ! शब्द वापरतात. शिवाय हा शब्द वापरताना पुढचं वाक्य पण पूर्ण करत नाहीत. किंवा कोणाला घराबाहेर काढण्यासाठीही तरुणाई हा शब्द वापरते.
मी काय पौडावरून आलो का ?
पौड हे पुण्याजवळच गाव आहे. फक्त कोणी वेड्यात काढत असेल तर त्याला 'मी काय दुधखुळा वाटलो का' याऐवजी पुणेकर 'मी काय पौडावरून आलो का' असा प्रश्न विचारतात आणि आपणही कमी नसल्याचे दाखवून देतात.
गंडलय :
या शब्दाचा काहीतरी बिघडलं आहे असा साधा अर्थ आहे. पुण्यात कोणतीही गोष्ट बिघडली की हा शब्द पहिल्यांदा वापरलो जातो. उदाहरणार्थ अजून बस नाही आली, पीएमपी गंडली आहे किंवा सकाळपासून माझं नेट गंडलं आहे.