...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा
By राजू इनामदार | Published: November 7, 2024 04:21 PM2024-11-07T16:21:53+5:302024-11-07T16:23:16+5:30
खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात सदा खोत यांनी अनुचित वक्तव्य केले. त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने खोत यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी गुरूवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. खोत यांनी त्यांची पत्रकार परिषद रद्द केली व कार्यक्रमस्थळी येणेच टाळले
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकूश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे विशाल धनवडे तसेच माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर व अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते. भारतीय जनता पक्षाच्या नातू बाग येथील मिडिया सेंटरमध्ये खोत यांची गुरूवारी सकाळी पत्रकार परिषद होती. शरद पवार यांच्याबाबत एका जाहीर सभेत बुधवारी अनुचित वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात खोत यांचा निषेध केला जात आहे.
त्यातच खोत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केल्यामुळे बुधवारी रात्रीच काकडे यांनी त्यांची पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशारा दिला होता. मात्र खोत त्यांनी ती परिषदच रद्द केली व तिथे येणेही टाळले. तरीही आघाडीच्या वतीने तिथेच आंदोलन करण्यात आले. खोत यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. काकडे यांनी सांगितले की खोत यांना कसलीही संस्कृती नाही. भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलतात. आज ते आले नाहीत, पण पुढे कधी ना कधी ते पुण्यात येतीलच, त्यावेळी त्यांनी आम्ही काय ते दाखवू. त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे.