बच्चेकंपनीला सुट्टीत फिरवा पुण्यातल्या या ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 07:34 PM2018-04-13T19:34:32+5:302018-04-13T19:34:32+5:30
लहानग्यांना घेवून फिरायचं असेल तर आणि वेळ कमी असेल तर आता काळजी नको. पुण्यातच असणारे आणि लहानांसोबत मोठ्यांनाही रमवणारे काही पर्याय खास लोकमतच्या वाचकांसाठी.
पुणे : परीक्षा संपून आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अशावेळी घरात बसून कंटाळा आलेल्या बच्चेकंपनीला घेऊन तुम्ही पुण्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देऊ शकता. अगदी शहरातच असणारी ही ठिकाण मुलांना तर खुश करतीलच पण तुमचा वेळ आणि खर्चही वाचवतील.
यशवंराव चव्हाण उद्यान (बागुल उद्यान)
सहकारनगरमध्ये असणारे बागुल उद्यान मनोरंजनाने पुरेपूर भरलेले आहे. आरशांचा महाल, भुलभुलैय्या,कारंजे, बाग, संग्रहालय अशा मन रामावणारे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे इथे सुट्टीत मुलांसोबत एक संध्याकाळ मस्त जाऊ शकते.
पु. ल. देशपांडे उद्यान दुनियादारी चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण इथे पार पडले. त्यातच इथली स्वच्छता, वेगळी मांडणी भुरळ घालणारी आहे. जपानी आणि भारतीय सौंदयाचा नमुना असणारे सिंहगड रस्त्यावरील हे उद्यान आवर्जून बघावे असेच आहे.
शनिवारवाडा
शनिवारवाड्याच्या आजूबाजूने आपण अनेकदा वावरत असतो पण आतून हा वाडा कसा आहे हे मुलांना नक्की दाखवा. वाड्याच्या कडेने असलेल्या तटबंदीवरुन चालत शनिवारवाड्याचा इतिहास त्यांना अनुभवण्याची संधी द्या.
सारसबाग
लहान असताना आपण अनेकदा सारसबागेत गेला असलात तरी मुलांना घेऊन किती वेळा गेला आहात ? तळ्यातल्या गणपती, त्यात फुलणारी कमळं बघण्यासाठी त्यांना सारसबागेची सफर घडावाच. शिवाय तिथे मिळणारी प्रसिद्ध कैरी भेळही चाखवण्यास विसरू नका.शेजारी असलेले पेशवे उद्यानही त्यांना आवडेल असेच आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज
अतिशय शांत आणि निसर्गरम्य असलेले हे ठिकाण कात्रजला आहे. अनेक प्रजातींचे प्राणी - पक्षी इथे प्रत्यक्षात दिसत असून इथे सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची गर्दी असते. प्राण्यांची आवड असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कात्रज तलाव
कात्रज तलावाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तिथे संध्याकाळच्यावेळी 'लाईट शो'ही असतात. शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी बच्चेकंपनी तर खुश होईलच पण आनंद मिळेल.