...इथे बहरते पंडितजीच्या आठवणींची ‘स्वरमैफल’; व्हॉट्स अॅपद्वारे स्वरभास्करप्रेमी आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:34 PM2017-12-16T18:34:36+5:302017-12-16T18:39:28+5:30
व्हॉट्स अॅपवर स्वरभास्करप्रेमी मंडळींना एकत्र आणणारा ‘स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी’ हा ग्रुप तीन महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आला असून, महाराष्ट्रासह देशविदेशातील रसिकांसाठी ही जणू एक ‘स्वरमयी’ मैफिलच ठरत आहे.
नम्रता फडणीस
पुणे : इथे संगीताबद्दल चर्चा झडतात...आॅडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगीतिक देवाणघेवाण होते....आठवणी सांगितल्या जातात..काहीशी संगीताची समीक्षात्मक मांडणी केली जाते..शिष्य गुरूविषयी भरभरून बोलतात...एखादा दुर्मीळ फोटो हवा असल्यास तो दिला जातो...या सर्व घडामोडींचा एक च केंद्रबिंदू असतो तो म्हणजे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी. आता तुम्हाला ‘इथे’ म्हणजे हे सर्व घडते कुठे? हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. तर संवादाचे जग जवळ आणणाऱ्या व्हॉट्स अॅपवर स्वरभास्करप्रेमी मंडळींना एकत्र आणणारा ‘स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी’ हा ग्रुप तीन महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आला असून, महाराष्ट्रासह देशविदेशातील रसिकांसाठी ही जणू एक ‘स्वरमयी’ मैफिलच ठरत आहे.
पंडित भीमसेन जोशी म्हणजे भारतीय अभिजात संगीताच्या दरबारातील अलौकिक असे एक रत्न. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतावर उत्तम प्रभुत्व असलेल्या पंडितजींनी आपल्या किराण्याच्या घरंदाज गायकीतून स्वत:चा एक श्रोतृवर्ग निर्माण केला. पंडितजींचा देह अनंतात विलीन झाला असला तरी त्यांच्या अद्वितीय सुरांमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात कायमचे अजरामर झाले, हा ग्रुप जणू त्याचेच एक प्रतिक आहे. त्यांच्या सुरांना हृदयात बंदिस्त केलेला रसिक आजही त्यांच्या मैफिलींच्या आठवणींमध्ये रमून जातो तर तरूण पिढी त्यांच्या सहवासाला कायमच मिस करते. पंडितजींच्या सांगीतिक देवाणघेवाणीचा हा प्रवास या ग्रुपच्या माध्यमातून घडतो, असे या ग्रुपचे संस्थापक अमित बागुल ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, सुरूवातीच्या काळात माझ्याकडे पंडितजीचे सुरेख असे कलेक्शन होते मात्र ते गहाळ झाल्याने पुन्हा ते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण ते एका झटक्यात कुठे मिळत नव्हते. जसे माझ्याकडे कलेक्शन आहे तसे इतरांकडे असू शकते असे वाटले. मग काही लिंक वेगवेगळ्या ग्रुपवर अपलोड केल्या. यामुळे अनेक व्यक्ती संपर्कात आले आणि असा काही ग्रुप आहे का अशी विचारणा केली. मग तीन महिन्यांपूर्वी काही मोजक्या स्वरभास्कर प्रेमी मंडळींना घेऊन हा ग्रृप तयार केला. आजमितीला या ग्रुपचे २५० सदस्य आहेत, त्यामध्ये मराठी, कानडी, बंगाली तसेच देश विदेशातील रसिकांचा समावेश आहे. या ग्रृपमध्ये पंडितजींच्या मैफिलींच्या आठवणी, प्रसंग, संगीताची समीक्षा यांची देवाणघेवाण होते. काही आॅडिओ आणि व्हिडिओ क्लिप टाकल्या जातात. कुणी संगीतावर चांगले पुस्तक वाचले असेल तर त्याची माहिती शेअर केली जाते. पंडितजींचे काही शिष्यही या ग्रुपमध्ये आहेत ते त्यांचे अनुभव सांगतात. ज्यांना पूर्वी शास्त्रीय संगीताची गोडी नव्हती पण पंडितजींचे सूर ऐकल्यानंतर संगीताबददल रूची निर्माण झाली असल्याची कबुलीही कबुली देतात. हा असा पंडितजींच्या सांगीतिक संपदेला बहरून टाकणारा असा एक ग्रुप असल्याचे बागुल यांनी सांगितले.