पुण्यात इथे सकाळी ३ वाजताही मिळतो नाष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:30 PM2018-03-11T18:30:14+5:302018-03-11T18:30:14+5:30
पुण्यात सध्यातरी नाईट कल्चर नसलं तरी मध्यरात्री फिरायला, किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. पहाटे नाष्टा मिळत असल्याने अश्यांची चांगली साेय झाली अाहे. पहाटे नाष्टा करण्यासाठी बाहेर पडण्याचे कल्चर पुण्यात हळूहळू अाता रुजतय.
पुणे : बाहेर गावावरुन मध्यरात्री पुण्यात आलात आणि भूक लागलीये किंवा नाईट आऊटचा प्लॅन आहे आणि खायची सोय होत नाहिये. तर मग तुम्हाला पुण्यातील नळस्टॉप आणि कोथरुड येथील करिष्मा चौक या ठिकाणी रात्री ३ वाजताही निश्चित नाष्टा मिळेल.
पुण्यात शिक्षणासाठी तसेच कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच पुण्यात महाविद्यालयेही अधिक असल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा तरुण-तरुणी रात्री भटकण्यासाठी बाहेर पडतात. त्याचबरोबर रात्रभर जागून अभ्यास करणारेही असतात. कंपन्यांमधून नाईट शिफ्ट करुन बाहेर पडणारेही अनेक अाहेत. अशातच पहाटे नाष्टा मिळाला तर त्याची मजाही काही औरच असते. हीच तरुणांची गरज ओळखून पुण्यातील नळस्टॉप चौकातील अमृतुल्य आणि कोथरुड येथील करिश्मा चौकातील एक फूड स्टॉल मध्यरात्रीही सुरु असतो. हा स्टॉल रात्री एक ते सकाळी पाच वाजेपर्यंत सुरु असतो, तर नळस्टॉप चौकातील अमृतुल्य पहाटे ३ वाजल्यापासून सकाळ पर्यंत सुरु असते. या दोन्ही ठिकाणी गरमा गरम पोहे, उडीद वडा, इडली, समोसा यांसारखे असंख्य पदार्थ खायला मिळतात. या पदार्थांना वाफळलेल्या चहाची सोबत असतेच. या पदार्थांचा आस्वाद घेता घेता गप्पांचा फड रोज पहाटे रंगवला जातो. यात तरुणीही मागे नाहीत. या ठिकाणी पहाटे पोहे खाण्यास येणाऱ्या तरुणींची संख्याही बरीच असते.
पुण्याच्या स्मार्ट पुणेकर तरुणांचे प्लॅनही भन्नाट असतात. पहाटे केवळ पोहे खाण्यासाठी या ठिकाणी येणारे अनेक खवय्ये आहेत. असाच एका नाटकाची तालीम संपल्यानंतर पोहे खाण्यासाठी आलेला रवी चौधरी म्हणाला, आम्ही मित्र अनेकदा या ठिकाणी पहाटे पोहे खाण्यासाठी येत असतो. नाईट आऊटचा प्लॅन असेल किंवा पहाटे लवकर कुठे बाहेर जायचे असेल, आम्ही इथला नाष्टा केल्याशिवाय जात नाही. पहाटेच्या शांत वातावरणात पोहे खात मित्रांशी गप्पा मारण्यात खरी मजा आहे. महिन्यातून दोन-तीन वेळा आम्ही इथे येतोच येतो.
असाच मनिषही आपल्या मित्रांसोबत नाष्टा करण्यासाठी आला होता. मनिष स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत आहे. अनेकदा पहाटे उठून किंवा रात्री उशीरापर्यंत आम्ही अभ्यास करत असतो. तेव्हा भूक लागल्यावर या ठिकाणी नाष्टा करायला येत असतो. यामुळे आमच्या सारख्यांची चांगली सोय झाली आहे. असे मनिष म्हणाला. नाईट शिफ्ट करुन आलेला अनुजही पहाटे कामावरुन घरी जाताना नाष्टा मिळत असल्याने समाधान व्यक्त करतो.