या दगडापासून व्हायची पुण्याची सुरुवात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:12 PM2018-06-14T21:12:18+5:302018-06-14T21:12:18+5:30
सर्वसाधारणपणे जेवढी महापालिकेची हद्द असते तेवढे शहराचे क्षेत्रफळ मानले जाते. जसजसा महापालिका क्षेत्राचा विस्तार होतो तसतसे शहर अवाढव्य बनत जाते.
पुणे : सर्वसाधारणपणे जेवढी महापालिकेची हद्द असते तेवढे शहराचे क्षेत्रफळ मानले जाते. जसजसा महापालिका क्षेत्राचा विस्तार होतो तसतसे शहर अवाढव्य बनत जाते. पण दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी त्यावेळी साधू वासवानी रस्त्यावरील पोस्ट ऑफिसजवळ झिरो स्टोन अर्थात शून्य मैलाचा दगड उभा करून शहर हद्दीचा प्रारंभ बिंदू मानला होता.
पुणे शहर दिवसेंदिवस विस्तार आहे. अनेकदा लांबचे उपनगर मानला जाणारा भाग आज शहरात समाविष्ट झाला आहे. सुमारे ५०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते शहरात आहेत. अशावेळी जुन्या झिरो स्टोनचा मात्र शहर प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे एकेकाळी शहराची हद्द ठरवणारा ऐतिहासिक ठेवा धूळ खात उभा असल्याचे दिसते. या दगडावर झिरो स्टोन या अक्षरांसह पुणे नाशिक, अहमदनगर, पौड रोड अशा विविध गावांची नावे कोरलेली आहेत. मात्र या इतिहासाची पाऊलखुण असलेल्या या दगडाचे जतन करण्यासाठी त्याभोवती चौकटीचे सुशोभिकरण करण्यास सुरुवात झाली आहे. हे काम अद्यापही पूर्ण झाले नसून अनेकदा बंदच असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.
असाच दगड पुणे कॅंटोन्मेंटची हद्द ठरवण्यासाठी चार बाजूने उभा करण्यात आला आहे. मात्र त्याला चुना लावून त्याचे जतन करण्यात आले आहे. याबाबत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी इंग्रजांनी प्रत्येक गावाची हद्द त्या गावाच्या पोस्ट ऑफिसपासून मोजण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.यामुळे त्या शहरापासून इतर आजूबाजूच्या गावांचे अंतर मोजण्यास सुकर होत होते. असे दगड वाढत्या शहरीकरणाच्या काळात आठवण म्हणून जपायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले.