खाजगी वाडे हेरिटेज करून पुर्नबांधणीला खीळ; शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाडामालकांची नाराजी

By निलेश राऊत | Published: February 23, 2024 11:51 AM2024-02-23T11:51:10+5:302024-02-23T11:52:26+5:30

हेरिटेजमध्ये वाडा असल्याने केवळ आम्ही दुरूस्ती करू शकतो, पण त्याची पुर्नबांधणी आम्हाला करता येत नाही, वाडामालकांची नाराजी

Heritage private mansions spur rebuilding; The displeasure of old landlords in Shaniwarwada area | खाजगी वाडे हेरिटेज करून पुर्नबांधणीला खीळ; शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाडामालकांची नाराजी

खाजगी वाडे हेरिटेज करून पुर्नबांधणीला खीळ; शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाडामालकांची नाराजी

पुणे : शनिवारवाडा हेरिटेज वास्तू म्हणून जाहिर केला पण, आमचे वाडेही हेरिटेज वास्तूमध्ये महापालिकेने घेऊन आमच्या वाड्यांच्या पुर्नबांधणीला खील घातली आहे. हेरिटेजमध्ये वाडा असल्याने केवळ आम्ही दुरूस्ती करू शकतो, पण त्याची पुर्नबांधणी आम्हाला करता येत नसल्याने शनिवारवाडा परिसरातील वाडामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

शनिवारवाड्याच्या शंभर मीटर परिघात हेरिटेज विभागाच्या नियमावलीमध्ये नवीन बांधकामांना परवानगी नाही. यामुळे शनिवारवाड्यानजीक असलेल्या सरदार मुजुमदार वाड्यासह सरदार पारसणीस वाडा, बिनीवाले वाडा, काळे वाडा, रास्ते वाडा, पुरंदरे वाडा, पटवर्धन वाडा, मोटे वाडा या हजारो चौरस मीटर वाड्यांची दुर्दशा होत चालली आहे. एकीकडे महापालिकेने या वाड्यांना हेरिटेज वास्तू म्हणून दर्जा दिला असला तरी, या वाड्यांमध्ये केवळ दुरूस्ती करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यातील काही वाडे हे शनिवारवाड्यापेक्षाही जुने असून, ते सर्व लाकडी बांधकामात आहे. नव्याने आहे त्याच पध्दतीने दुरूस्त करणे हे शक्य नसून, ते मोठे खर्चिक व किचकट काम आहे़ त्यामुळे यापैकी अनेक वाडा मालकांनी या वाड्यातून स्थलांतर करणे पसंत केले आहे. दरम्यान या वाड्याच्या दुरूस्तीसाठीही अनेक अडचणी प्रशासकीय स्तरावर येत असल्याची खंत सरदार मुजुमदार वाड्यातील सरदार मुजुमदार यांच्या अकराव्या वंशज अनुपमा मुजुमदार यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केली. 

मंगळवारीच या वाड्यापैकी पटर्वधन वाड्याचा काही भाग कोसळून वृध्द दांपत्य जखमी झाले. महापालिकेने लागलीच या वाड्याचा तळमजला सोडून उर्वरित भाग उतरविण्याची कार्यवाही केली. पण अशाच प्रमारे धरणफुटीमध्ये नुकसान झालेले व आजपर्यंत तग धरून राहिलेले ह वाडे एकामागोमाग कोसळत राहिले तर या हेरिटेज वास्तू येथे होत्या म्हणून केवळ आपण नील फलक लावणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शनिवारवाडा परिसरातील व अन्य भागात महापालिकेने हेरिटेज बी ग्रेडमध्ये जाहिर केलेल्या जुन्या वाड्यांमधील बांधकाम दुरूस्ती याबाबत महापालिका वाडा मालकांना मार्गदर्शन व मदत करण्यास तयार आहे. या वाडा मालकांनी आमच्याशी संपर्क साधावा. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता पुणे महापालिका

आम्हाला न सांगता आमचे वाडे हेरिटेज बी ग्रेडमध्ये घेतले गेले. यातील पटवर्धन वाड्याचा काही भाग कोसळला. वाडा धोकादायक झाल्याने नवीन बांधकाम करता येत नसल्याने वाडा मालक वाडा सोडून गेले यात सरकारने काय मिळविले. आमच्या वाड्यांना दुरूस्तीला परवानगी आहे पण मातीच्या भिंती व लाकडी काम यामुळे दुरूस्ती तरी कशी करायची. हेरिटेज वास्तू जपायच्या असतात, पण या नियमावलीमुळे वाडे उद्धवस्त होत चालले आहे. - अनुपमा मुजुमदार, सरदार मुजुमदार वाडा 

Web Title: Heritage private mansions spur rebuilding; The displeasure of old landlords in Shaniwarwada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.