राज्यातील वारसास्थळे दुर्लक्षितच
By admin | Published: April 19, 2016 01:03 AM2016-04-19T01:03:19+5:302016-04-19T01:03:19+5:30
वारसास्थळांच्या सुरक्षिततेकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. वर्षातून एकदा वारसादिन साजरा करणे आणि त्यात समाधान मानणे ही वृत्ती चुकीची आहे.
वारसास्थळांच्या सुरक्षेबाबत काय वाटते?
- वारसास्थळांच्या सुरक्षिततेकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. वर्षातून एकदा वारसादिन साजरा करणे आणि त्यात समाधान मानणे ही वृत्ती चुकीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर वारसास्थळांकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करत आहोत, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. प्रत्येकच महत्त्वाच्या स्थळाला वारश्याचा दर्जा मिळतो, असे नाही. मात्र, आपल्या राज्यात जी निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित वारसास्थळे आहेत त्यांचे रक्षण करणे हे समाजाचे आणि शासनाचे काम आहे. ते योग्य पद्धतीने व्हायला हवे. या सर्व कामासाठी शासन पुरे पडेल, असे नाही. त्यामुळे स्थानिकांनी यासाठी पुढाकार घेऊन या वास्तू जपायला हव्यात.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंबाबत काय वाटते?
- महाराष्ट्रात सिंधुदुर्गसारखा सागरी किल्ला, समुद्रातील अष्टपैलू हिरा म्हणावा असा जंजिरा किल्ला आहे. शिवरायांचा पराक्रम दुमदुमत ठेवणारे राजगड, रायगडसारखे गड आहेत. याबरोबरच नाशिकजवळ थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री असलेल्या गोपिकाबार्इंचा वाडा, तर कोपरगाव येथे आनंदीबार्इंचा असलेला वाडा या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू आहेत. पुण्यातही नाना वाडा, विश्रामबाग वाडा, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा क्रांतिकारकांची घरे आहेत. त्याकडे लक्ष देण्याचे कर्तव्य कोणाचे?
राज्यातील वारसा असलेल्या कोणत्या वास्तू दुर्लक्षित आहेत?
- महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक तालुक्यात कलासंपन्न असे मंदिर आहे. वास्तुरचनेच्या दृष्टीने एकमेव अशीही अनेक मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे आज अखेरचा श्वास घेत आहेत. काही दुर्मिळ मूर्ती भग्नावस्थेत आणि दुलर्क्षित आहेत. हा वारसा जपणे आपले काम आहे. परभणीतील धारासुर येथील बाराव्या शतकातील घडीव विटांचे शिखर असलेल्या मंदिरात विष्णूच्या केशवादी २४ मूर्ती आहेत.
याकडे शासन आणि समाज कोणाचेच लक्ष नाही. बीड जिल्ह्यातील धर्मपुरी येथेही केदारेश्वरचे उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले मंदिर आहे. विदर्भातही ब्रह्मा, विष्णू, सूर्य, शीव असे एकत्रित असलेल्या अनेक मूर्ती आहेत. आपल्याकडील नाही, मात्र परदेशातील अभ्यासक याचा अभ्यास करताना दिसतात.
कोणती काळजी घ्यायला हवी?
- अनेक अद्वितीय अशा मूर्ती आता कमी झाल्याचे दिसते. या मूर्तींची तस्करी होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरुक असायला हवे. असे न झाल्यास आपल्याच वारशाचा अभ्यास आपल्याला परदेशात जाऊन करावा लागेल आणि येत्या काही दिवसांतच हे होईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे शासन व समाज यांनी वारसा संभाळायची, त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात अनेक वारसास्थळे असून, त्याची योग्य पद्धतीने देखभाल होत नसल्याची भावना मूर्ती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ऐतिहासिक मूर्तींची तस्करी होऊन त्या परदेशात जाण्याचे प्रमाण मोठे असून, भारतातून ही तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. वर्षाला होणाऱ्या तस्करीतून कित्येक हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठेवा असून, त्याची आपण योग्य ती काळजी घेत नसल्याने तो आपल्याकडून दुसरीकडे जात आहे. त्यामुळे विशिष्ट भागातील स्थानिक आणि शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.