‘हेरिटेज टुरिझम’ला चालना मिळावी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:18 AM2017-11-25T01:18:01+5:302017-11-25T01:19:16+5:30

पुणे : फणीआळी तालीम, नाना वाडा, बेलबाग विष्णू मंदिर, बुरूडआळी, तांबटआळी यासारखी अनेक वारसा स्थळे आजही शहराच्या पर्यटनाच्या नकाशावर धूसरच आहेत

The 'Heritage Tourism' needs to be encouraged, social organizations need to take the initiative | ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना मिळावी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

‘हेरिटेज टुरिझम’ला चालना मिळावी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

googlenewsNext

पुणे : फणीआळी तालीम, नाना वाडा, बेलबाग विष्णू मंदिर, बुरूडआळी, तांबटआळी यासारखी अनेक वारसा स्थळे आजही शहराच्या पर्यटनाच्या नकाशावर धूसरच आहेत. शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, सारसाबग, सिंहगड, पर्वती, आगाखान पॅलेससारख्या वास्तूंप्रमाणे या दुर्लक्षित वारसा स्थळांकडे लक्ष दिले व ती विकसित केली तर पुणे शहरात भविष्यात हेरिटेज टुरिझमला चांगली चालना मिळू शकते.
भारतात १९ ते २५ नोव्हेंबर हा ‘जागतिक वारसा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. नागरिकांमध्ये देशातील प्राचीन वारशाबद्दल जागृती निर्माण करणे व भावी पिढ्यांना आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी आस्था निर्माण करण्याच्या प्रमुख उद्देशाने हा सप्ताह साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, पुणे शहरातील वारसा स्थळांची माहिती घेतली असता शहरात अनेक वारसा स्थळे आजही दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास आले. सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर याचबरोबर आयटी सिटी म्हणून पुण्याची ओळख जागतिक पातळीवर पोहोचली आहे. वैद्यकीय पर्यटन म्हणून शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. यामुळे शहरामध्ये दर वर्षी जगभरातील नागरिक विविध कारणांसाठी भेट देतात.
शहरात असलेली पातळेश्वर मंंदिर, आेंकारेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, कसबा गणपती मंदिर याचबरोबर शिंदे छत्री, कौन्सिल हॉल, डेक्कन महाविद्यालय, जयकर बंगला यासारख्या वास्तू पर्यटकांना आकर्षिक करू शकतात.
महापालिकेच्या हेरिटेज सेलमार्फत शहरातील काही वास्तूंचा विकास करण्याचे काम सुरू आहे; परंतु अद्याप शहरातील पर्याटनाच्या नकाशावर नसलेल्या वारसा वास्तूंची यादी करून त्याबाबत जनजागृती करणे, शहरात विविध ठिकाणी माहिती फलक लावणे, संकेतस्थळावर माहिती देणे आदी अनेक उपक्रम राबविण्याची गरज आहे. पुणे शहराला जगाच्या नकाशावर ‘हेरिटेज शहर’ म्हणून नवी ओळख निर्माण हाईल, असा आशावाद महापालिकेच्या वारसा विभागाचे निवृत्त अधिकारी श्याम ढवळे यांनी व्यक्त केला.
शहरात येणाºया पर्यटकांना सध्या शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, सारसाबग, सिंहगड, पर्वती अशी मोजकीच ठिकाणे माहिती आहेत. परंतु, शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अनेक ठिकाणे आजही दुर्लक्षित आहेत. सस्किंृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर आणि परिसरात अनेक हेरिटेज वास्तू आहेत. शहरातील या वारसा स्थळांचा शहराच्या हेरिटेज टुरिझमसाठी चांगला उपयोग करून घेता येईल.
>हेरिटेज शहरासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा
पुण्याची जगाच्या नकाशावर हेरिटेज शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी विविध संस्था, व्यक्ती यांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहरामध्ये डेक्कन कॉलेज, भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधन संस्थेसारख्या अनेक संस्था, व्यक्तींचे प्राचीन संशोधनात मोठे योगदान आहे. त्यामुळे सांस्कृतिक, विद्येचे माहेरघर व आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याची हेरिटेज शहर म्हणूनदेखील ओळख निर्माण होईल. हेरिटेज वारसाचा विकास केल्यास शहराचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास होण्यास मदत होईल
- श्याम ढवळे, निवृत्त अधिकारी, महापालिका वारसा विभाग

Web Title: The 'Heritage Tourism' needs to be encouraged, social organizations need to take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.