सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हेरिटेज वॉक; वर्धापनदिनापासून शुभारंभ, भुयाराचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:05 PM2018-02-09T14:05:48+5:302018-02-09T14:09:31+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वास्तू व परिसरातील वारसा उलगडून दाखवणारा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्यातून एक दिवस यासाठी निश्चित केला जाणार आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वास्तू व परिसरातील वारसा उलगडून दाखवणारा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्यातून एक दिवस यासाठी निश्चित केला जाणार आहे. मुख्य इमारत ते पोतदार संकुल यांना जोडणाऱ्या ३०० फुटाच्या भुयाराचे या वॉकमध्ये खास आकर्षण असणार आहे. याचे उद्घाटन विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिनी शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.
विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने हेरिटेज वॉक या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात होत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खाली असलेल्या भुयाराचा शोध काही दिवसांपूर्वीच लागला. त्यानंतर या भुयाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुख्य इमारत व ते पोतदार संकुल यांना जोडणारा ३०० फुटांचा भुयारी मार्ग विद्यापीठाकडून खुला करण्यात येणार आहे. पूर्वी पोतदार संकुल येथे भटारखाना होता, तेथून मुख्य इमारतीमध्ये तयार केलेले जेवण घेऊन जाण्यासाठी भुयाराचा वापर होत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
भुयाराबरोबरच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, उंच मनोरा, भव्य दालने, त्यातील कलाकुसर, ऐतिहासिक आयुधे व त्यांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. मुख्य इमारतीत नव्याने संग्रहालय उभारण्यात येत आहे. तेथे भूशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास या विषयाच्या काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हेरिटेज वॉकच्या पुढच्या टप्प्यात वनस्पती-प्राणीसंपदा लाभलेला नैसर्गिक वारसा उलगडून दाखवण्यात येणार आहे.