पानशेत धरण फुटी संकटातला ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड ; महादेव शिंदे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:01 PM2021-05-31T22:01:35+5:302021-05-31T22:02:07+5:30
१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले त्यावेळी महादेव शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून अनेक जणांचा जीव वाचवला होता.
पिंपरी : पुण्याच्या आधुनिक इतिहासात पानशेत धरण फुटलेला १२ जुलै १९६१ हा काळा दिवस ठरला. धरण फुटून शहरात पुरस्थिती निर्माण झाली. त्या पुराच्या पाण्यात उडी मारून अनेकांचे जीव वाचवणारे तत्कालीन पोलीस कर्मचारी महादेव रामभाऊ शिंदे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने कासारवाडी येथे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील मुळचे असलेले महादेव शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण अवसरीत तर उर्वरित शिक्षण खेड येथे झाले. कुस्तीची आवड असल्याने शारीरिक तंदुरुस्तीबाबत ते आग्रही असत. १९५२ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. वानवडी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून सेवा बजावत असताना १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले. त्यावेळी महादेव शिंदे हे येरवडा परिसरात कर्तव्यावर होते. पुरामुळे अनेकजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून अनेक जणांचा जीव वाचवला. तसेच त्याचवेळी पुरात वाहून आलेला सोन्याच्या दागिन्यांचा डबा त्यांना सापडला. तो डबा आणि दागिने शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जमा केला. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर एक महिला दागिने पुरात हरवल्याबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी तिला दागिन्यांचा डबा देण्यात आला. शिंदे यांच्या या प्रामाणिकपणाचा तसेच अनेकांचे जीव वाचवल्याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शिंदे यांचा सन्मान केला होता. आयुक्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.
महादेव शिंदे यांचा मुलगा प्रमोद शिंदे म्हणाले, आमचे वडील शरीराने धडधाकट तर होतेच मनानेही कणखर होते. त्यामुळे अर्धांगवायूच्या धक्क्यातूनही ते सावरले. जिल्हा पोलीस मॅन्यूअल तोंडपाठ होते. मृत्यूच्या दोन तास आधी त्यांनी माझी मुलगी राधिका हिला चित्र काढून दिले. कोठे काय त्रास होत आहे, याबाबत त्यात नमूद केले होते.
राजेंद्र शेळके म्हणाले, पोलीस म्हणून त्यांनी उत्तम सेवा केलीच मात्र सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्य केले. तसेच जनसंपर्क वाढवून अनेक माणसे जोडली.