अहो ऐकलं का ? 'जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास'..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 10:10 IST2024-11-30T10:07:17+5:302024-11-30T10:10:59+5:30

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात एकही शाळा नापास नाही

hey did you hear 'Just as all boys pass, all schools also pass'..! | अहो ऐकलं का ? 'जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास'..!

अहो ऐकलं का ? 'जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास'..!

- भरत निगडे

नीरा :
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ५ हजार १५२ पैकी ४ हजार ६३२ प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला होता. पुणे जिल्ह्यातील सहभागी सर्व शाळा पास झाल्या असून, राज्यस्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे प्रथम क्रमांक आलेला आहे. तर जि. प. प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन विभाग स्तरावर तिसरा क्रमांक आलेला आहे. राज्य शासनाच्या विद्यार्थी नापास न करण्याच्या धोरणाप्रमाणे एकही शाळा नापास झाली नाही.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात जवळजवळ ९५ टक्के शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही झाली आहे. 

दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ६३२ शाळांचा सहभाग

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ६३२ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी राज्यस्तरीय १, विभागीय स्तरावर १, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढलेला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले आहेत. 

काय आहे अभियान

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

मूल्यांकनात हे निकष महत्त्वाचे

अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधेसाठी ३३ गुण, शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी ८४ गुण तर शैक्षणिक संपादणुकीसाठी ४३ गुण आहेत. सहभागी शाळांचे बृहन्मुंबई महानगरपालिका, अ व ब वर्ग च्या महानगरपालिका, उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील गठीत समित्या शाळांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करतात. मूल्यांकन समित्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले. प्रश्नावलीच्या स्वरूपात योग्य ती माहिती संबंधित शाळेकडून प्राप्त करून घेऊन आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: डी.एड, बी.एड या महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची या कामासाठी मदत घेतील.

अभियानात पात्र ठरल्यास हा फायदा
पारितोषिक बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख व तिसरे पारितोषिक ११ लाख रुपयांचे असेल. उर्वरित महाराष्ट्रात ३५८ तालुक्यात पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख, राज्यातील ३६ जिल्ह्यात पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख तर ८ विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना तालुकास्तरावर पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख, जिल्हास्तरीय पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख, विभागस्तरीय पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख तर राज्यस्तरीय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पहिले ५१ लाख, दुसरे ३१ लाख व तिसरे २१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढलेला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढलेला आहे. अभियानामध्ये शाळा पास नापास ठरवलेला नाही."
- अस्मा मोमीन : वरिष्ठ सहायक शिक्षणाधिकारी जि. प. पुणे प्राथमिक शिक्षण विभाग

Web Title: hey did you hear 'Just as all boys pass, all schools also pass'..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.