'अरे आमची पोर फटाके विकतायेत गांजा नाही', वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट, पोलिसांना खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 04:15 PM2023-11-10T16:15:10+5:302023-11-10T16:16:41+5:30
पोरांना फटाके विक्रीचे धंदे करू द्या त्यांची दिवाळी चार दिवसांचीच
कात्रज : दीपावलीचा सण सुरू झाला असून खरेदीसाठी नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी फटाके स्टॉल देखील लागलेले आहेत. या फटाका स्टॉल साठी महानगरपालिकेकडून रिकाम्या असणाऱ्या जागा फटका स्टॉल साठी भाड्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी काही नियम अटी देखील महानगरपालिकेने घातल्या याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
अनेकांनी या फटाका स्टॉल साठी परवानगी घेऊन स्टॉल देखील टाकले. कात्रज सह इतर परिसरामध्ये असणाऱ्या स्टॉल धारकांना त्रास होत असल्यामुळे स्टॉलधारकांनी वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांच्याकडून काही ठिकाणचे पोलीस व महानगरपालिकेचे कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याची तक्रार केली त्यानंतर वसंत मोरे यांनी पैसे मागायला आलेल्या एका पोलिसाशी संपर्क केला असता त्या पोलिसानेच ही वसंत मोरे यांची हद्द आहे का असे सांगितले. त्यावर वसंत मोरे यांनी पोस्ट केली आहे.
पोरांना धंदे करू द्या त्यांची दिवाळी चार दिवसांचीच
दिवाळीतले चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला कोणाला अडचण होणार नाही. याची काळजी घेऊन फटाकड्याचे स्टॉल लावून बसलेले आहेत. ''ते पण व्याजाने पैसे आणून मागच्या दोन दिवसापासून रोज ऐकतोय, अतिक्रमण वाले एवढे मागतात, पोलीस तेवढे मागतात ट्रॅफिक वाले एवढे मागतात, अरे आमची पोर फटाके विकत आहेत गांजा नाही. आज तर एका पोलिस महाशयांनी कमालच केली. एक पोरग त्यांना म्हटलं, वसंततात्या मोरे संग बोला तर साहेब बोलले की ही त्यांची हद्द आहे का? माझी हद्द ठरवायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला तेव्हा साहेब हात जोडून विनंती आहे की, पोरांना धंदे करू द्या त्यांची दिवाळी चार दिवसांचीच आहे. तुमची दिवाळी उरलेले 361 दिवस चालते. आमची दिवाळी नीट झाली नाही, तर तुमचा रोज शिमगा होईल तेव्हा उगाच हद्दीच्या भानगडीत पडू नका. नाहीतर एका दिवसात सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती घेतले ते जाहीरपणे सांगावे लागेल असे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हंटल आहे.