अहो आश्चर्य ! एका मिनिटात फोनची बॅटरी होणार चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:02 PM2018-03-31T17:02:14+5:302018-03-31T17:02:14+5:30
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेमध्ये आता मोबाईल फोनचाही समावेश होतो आहे. हल्ली प्रत्येक क्षणी मोबाईल सोबत ठेवण्याची अनेकांना सवय आहे. पण अनेकदा बॅटरी डिस्चार्ज होत असल्याने त्यांचा रसभंगही होतो पण आता काळजी नको कारण येणार आहे का भन्नाट उपाय.
पुणे : मोबाईल फोन वापरायचा म्हटलं की त्याची बॅटरी टिकवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. हल्ली पॉवर बँकेची सोय असली तरी त्यालाही मर्यादा आहे. अशावेळी एका मिनिटात मोबाईल बॅटरी चार्ज होण्याचे नवे संशोधन उदयास आले आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विकसित केलेली बॅटरी अक्षरशः 1 मिनिटात चार्ज होते. शिवाय तिची कार्यक्षमता उच्च असून ती चक्क फोल्डेबल म्हणजे घडी घालण्याजोगी आहे असाही त्यांचा दावा आहे! सध्या वापरात असणाऱ्या लिथिअम-आयन बॅटऱ्यांना अल्युमिनियम बॅटऱ्यांचा पर्याय असणार आहे.बॅटरी चार्ज करत असताना स्फोट होण्याच्या घटना अनेकदा बघायला मिळतात. मात्र या बॅटऱ्यांना तसाही धोका नसल्याचे मत तज्ञ नोंदवत आहेत.नव्या रचनेची ही बॅटरी बनवताना ऍल्युमिनिअमची काही वैशिष्ट्ये उपयोगी पडली आहेत. याशिवाय जुन्या बॅटऱ्यांचे विघटन होत नसल्याने त्यांचा कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होत असे. मात्र ही बॅटरी अधिककाळ टिकणारी असल्याने कचरा कमी निर्माण होणार आहे विद्युत्भार साठवून ठेवण्याची ऍल्युमिनिअमची क्षमता तुलनेने अधिक असते. इतर धातूंपेक्षा ते स्वस्त असते आणि चटकन पेटत नाही. ह्यामुळे कार्यक्षम, स्वस्त आणि सुरक्षित बॅटर्यांच्या निर्मितीसाठी ऍल्युमिनिअम वापरणे श्रेयस्कर असे ह्या टीमचे म्हणणे आहे. ही नवी बॅटरी लिथिअम-आयन बॅटरीच्या तुलनेत कमीच व्होल्टेज निर्माण करीत असल्याने ऊर्जाक्षमतेवर अजून संशोधन सुरु आहे.याबाबत डॉ दीपक शिकारपूरयांनी याबाबत बोलताना हा एक वेगळा शोध असून त्याने सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात मोठा फरक पडणार असल्याचे सांगितले.एका नव्या दिशेने केलेले हे संशोधन, त्यातून तयार झालेल्या वस्तूचा वेगळेपणा आणि तिच्या वापराने पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम पाहता बॅटरीचे स्वागत करायला हवे असेही ते म्हणाले.