नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 01:12 PM2024-04-03T13:12:02+5:302024-04-03T13:15:25+5:30

दहा पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल, पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांची व्यथा

Hi only drought No water have to leave the village Zero percent water storage in Nazre dam of Purandar | नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा

नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा

श्रीकिशन काळे

पुणे : ‘‘गेल्या तीन-चार वर्षात पाऊसच पडला नाय, नुसता दुष्काळ हाय, आता पाण्यासाठी फिरावं लागतं. नाझरे धरणात हाय थोडं पाणी, पण तेही आता दहा-पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल,’’ अशी दुष्काळाची व्यथा पुरंदर तालुक्यातील आणि नाझरे धरणाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार वर्षांमध्ये चांगला पाऊस झाला नाही. गेल्या वर्षी केवळ ३३४ मिमी पावसाची नोंद झाली. नाझरे धरणात तर पाणीच साठले नाही. तिथे केवळ मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला पहायला मिळत आहे. नाझरे धरणात पाणी नसल्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना बंद पडल्या आहेत. या योजनांद्वारे २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. पण, नाझरे धरणातील पाणी संपल्याने सध्या पाणीपुरवठा थांबवलेला आहे. म्हणून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नाझरे धरणावर मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील मावडी तर बारामती तालुक्यातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रूक, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी, लोणी भापकर, माळवाडी, काटी, जळगाव कप, जळगाव सुपे, भिलारवाडी, कऱ्हावागज, अंजनगाव या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. तर पारगाव- माळशिरस योजनेवर कोळविहरे हे गाव तसेच नाझरे प्रादेशिक योजनेवर नाझरे कप, नाझरे सुपे, पांडेश्वर आदी पाच गावे अवलंबून आहेत. बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

पूर्वी कधीच नाझरे गावाला आणि परिसरात पाणी कमी पडत नव्हते. पण आता मात्र नदी कोरडी पडली, धरण कोरडे पडलेय. नाझरे गावात पूर्वी छोटा पूल होता. त्यावरून पाणी वाहायचे. म्हणून नवीन मोठा पूल बांधला. आता छोट्या पुलावरून देखील पाणी वाहत नाही. नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे ठाक पडलंय. राजकारणी लोकांनी आता काही तरी सोय करावी. मते मागायला येतील आता. दुष्काळात पाणी नाही मिळालं तर गाव सोडायची पाळी येईल. कुठं तरी जाऊन बिगारी काम करावे लागेल. जनावरांचे लय हाल आहेत. त्यांना पाणी विकत आणावे लागतेय. पिण्याच्या पाण्याचा जारही ३० रुपयांना मिळतोय. विकत घेऊन पाणी प्यावे लागतय. लय अवघड परिस्थिती हाय. - उत्तम शिंदे, ग्रामस्थ, नाझरे गाव

माझ्या चाळीस-पन्नास जित्राब (मेंढ्या) हाय. त्यांना तर पाणी लागतय. चारा नसला तरी एकवेळ ठिकय, पण पाणी पाहिजे. उन्ह एवढं तापतय त्यामुळे अंगातून नुसता घाम येतोय. या नाझरे धरणात तर पाणीच राहिलं नाही. आता नुसता गाळ हाय. दहा दिवस पाणी पुरेल, नंतर काय करायचे हा प्रश्नय. पाणी नाय मिळालं तर गावच सोडावं लागणार. त्याशिवाय पर्यायच नाय. - कामा महानवत, मेंढपाळ

मी लहानपणापासून धरणाजवळच राहतोय. पूर्वी धरण भरलेलं असायचे. आता तीन-चार वर्षे झाली धरणात पाणीच थांबेना. खाली विहिरी, बोअर घेतल्याने पाझर तिकडे जातोय. धरणात गाळ पण लय साठलाय. तो आता काढला जातोय, पण तो गाळबी कोणी घेऊन जाईना. आता यंदा निसर्गाने कृपा केली तर काही तरी होईल. नाय तर लय बेकार अवस्था येईल. रोजगारबी मिळेना कुठे ? पाणी नाही तर काहीच नाय. लोकांनी करायचे तरी काय ? - राजू चंदर बर्डे, ग्रामस्थ, नाझरे गाव

- नाझरे धरणांची क्षमता ०.५९ टीएमसी
- गतवर्षी अवघा ३३४ मिलिमीटर पाऊस
- गतवर्षी या धरणांत होता ०.३२ टीएमसी पाणीसाठा
- आता धरणात ० पाणीसाठा

Web Title: Hi only drought No water have to leave the village Zero percent water storage in Nazre dam of Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.