भ्रष्टाचार लपविण्याचा आटापिटा

By Admin | Published: July 6, 2017 03:19 AM2017-07-06T03:19:50+5:302017-07-06T03:19:50+5:30

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी जनतेच्या कामांचा विषय बाजूला ठेवून दिशाभूल करण्याचा भाजपाचा प्रयत्न

To hide corruption | भ्रष्टाचार लपविण्याचा आटापिटा

भ्रष्टाचार लपविण्याचा आटापिटा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी जनतेच्या कामांचा विषय बाजूला ठेवून दिशाभूल करण्याचा भाजपाचा प्रयत्न भाजपाने त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा गुन्हेगारी इतिहास जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. राष्ट्रवादीतील कालखंडातील कामांची, पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी लावली आहे, ते लवकरच गजाआड असतील, असे प्रत्युत्तर भाजपाने दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये टक्केवारीच्या विषयावरून भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. प्रमोद साठे यांच्या तक्रारीचा आधार घेऊन भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे व भाजपा सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यावर आरोप केले आहेत. ठेकेदारांना महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे यांच्या माध्यमातून रकमेची मागणी करीत असल्याचे तक्रारीत म्हटल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, तक्रारदार कोण आहे, त्यात दोन माजी महापौर आणि एक माजी स्थायी समिती अध्यक्ष कोण आहे, या विषयीची कुंडली वाचून दाखविली. राष्ट्रवादीने त्यानंतर याबाबत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.
वाघेरे म्हणाले, ‘‘भाजपाध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष व सारंग कामतेकर यांना जर तक्रारदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे हे माहिती होते, तर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे स्पष्टीकरण का दिले नाही?
पंतप्रधान कार्यालयाकडे
तक्रार झाली त्याला दोन महिन्यांचा काळ झाला आहे. राष्ट्रवादीने जनतेच्या केलेल्या कामांची
बिले देणे महापालिकेचे काम आहे म्हणून मागणी केली त्यात
काय चूक? आजपर्यंतच्या इतिहासात ३१ मार्चनंतरच्या ठेकेदारांच्या बिलांबाबत कधीच तक्रार झालेली नाही.
महापालिकेत जर आतापर्यंत नियमबाह्य बिले दिली जात होती, तर आजच भाजपाला साक्षात्कार झालाय का? इतके वर्षे का नाही झाला? प्रत्यक्षात सीमा सावळे व सारंग कामतेकर स्थायी समितीच्या आडून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करताना राष्ट्रवादी त्यांना अडचणीची ठरत आहे. महापालिकेत सर्वांनाच माहिती आहे.’’

राष्ट्रवादीचे काही नगरसेवक गजाआड : सीमा सावळे
स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘भाजपाची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कारभारास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीने केवळ आरोप करू नयेत, पुरावे द्यावेत. महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू असणाऱ्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले. ठेकेदारांच्या बिलांच्या परंपरेस चाप लावला. नियमानुसारही काम करू नये? राष्ट्रवादी कोणाची बाजू घेतेय, हेही तपासायला हवे. महापालिकेत यापूर्वी अंडरवर्ल्डच्या लोकांचा वापर केला गेला नव्हता. त्यांच्या माध्यमातून महापालिकेत दहशत करण्याचा प्रयत्न होत आहे. तक्रारदाराचा इतिहास न तपासताच त्याला संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादीने केली.मोघम आरोप करू नयेत. पुराव्यानिशी बोला. राष्ट्रवादीच्या कालखंडात झालेल्या चुकीच्या कामांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काही नगरसेवक लवकरच गजाआड जाणार आहेत.’’

‘‘चुकीची कामे होत असतील, तर त्या वेळी आज भाजपावासी झालेल्यांनी पूर्वीच्या चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घातले होते का? भाजपावाले बिथरले असून, त्यामुळे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. विकासकामे सोडून सुडबुद्धीचे राजकारण करणे हा त्यांच्या अजेंड्यावरील पहिला विषय आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या भूतकाळात जेलवारी करून आले म्हणून चुकीची कामे करतात म्हणून आरोप असेल, तर भाजपाने त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा भूतकाळ तपासून घ्यावा, असेही वाघेरे म्हणाले.

Web Title: To hide corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.