वाढीव पासबाबत एसटीची लपवाछपवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:34 PM2018-05-04T18:34:09+5:302018-05-04T18:34:09+5:30

एसटी प्रशासनाने आवडेल तेथे प्रवास योजने अंतर्गत चार दिवसांचा कालावधी वाढवून देण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, याबाबत पुरेशी प्रसिध्दी देण्यात न आल्याने प्रवाशांना याचा लाभ घेता आला नसल्याची कबुली एसटी प्रशासनाने दिली आहे.

Hide in incremental pass by st department | वाढीव पासबाबत एसटीची लपवाछपवी

वाढीव पासबाबत एसटीची लपवाछपवी

Next
ठळक मुद्देएसटी प्रशासनाने या निर्णयाची माहिती प्रवाशांना होण्यासाठी सर्व बसस्थानकांवर प्रसिध्दी करणे आवश्यकयोजनेतील वाढीव कालावधीसाठी पुन्हा ३१ मे २०१८ पर्यंत वाढ देण्याचा निर्णय

पुणे : मागील वर्षी ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मासिक, त्रैमासिक तसेच आवडेल तेथे प्रवास या योजनेतील पासधारकांना प्रवास करता आला नाही. त्यामुळे त्यांना या काळातील चार दिवस वाढवून देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. पण हा निर्णय प्रवाशांपर्यंत पोहचतच नसल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेबाबत प्रशासनाने १९ एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकाची माहितीच प्रवाशांना देण्यात आलेली नाही. एसटीच्या कर्मचारी संघटनांनी १७ ते २० आॅक्टोबर या कालावधीत विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. चारही दिवस राज्यात एकही एसटी बस मार्गावर आली नाही. त्यामुळे या काळात मासिक, त्रैमासिक आणि आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत पास घेतलेल्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता आला नाही. त्यामुळे प्रवाशांचे संपकाळातील चार दिवस फुकट गेले होते. हे चार दिवस पुढील पासमध्ये वाढवून देण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. याची दखल घेत एसटी प्रशासनाने आवडेल तेथे प्रवास योजने अंतर्गत चार दिवसांचा कालावधी दि. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवून देण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, याबाबत पुरेशी प्रसिध्दी देण्यात न आल्याने प्रवाशांना याचा लाभ घेता आला नसल्याची कबुली एसटी प्रशासनाने दिली आहे. याबाबत एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार एसटीचे महाव्यवस्थापक (वाहतुक) यांनी या योजनेतील वाढीव कालावधीसाठी पुन्हा ३१ मे २०१८ पर्यंत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याची योग्य प्रसिध्दी देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक दि. १९ एप्रिल रोजी सर्व विभाग नियंत्रकांना पाठविण्यात आले आहे. मात्र, पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही याविषयी प्रवाशांपर्यंत माहिती पोहचलेली नाही. सासवड ते पुणे प्रवास करणारे दत्तात्रय फडतरे यांनी प्रवाशांना वाढीव चार दिवस देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी पुणे विभागीय नियंत्रक कार्यालयात याबाबत चौकशी केल्यानंतर हे परिपत्रक समोर आले. याविषयी आगार प्रमुखांकडे चौकशी केली असता त्यांनाही माहिती नाही. मासिक व त्रैमासिक पासेसबाबतही प्रवाशांना अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे अनेकांना त्याचा लाभ घेता आला नाही, असे फडतरे यांनी सांगितले.

.........

एसटी प्रशासनाने या निर्णयाची माहिती प्रवाशांना होण्यासाठी सर्व बसस्थानकांवर प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. बसस्थानकांवर उद्घोषणा करणे, सुचना फलकांवर माहिती देणे, वृत्तपत्रांतून माहिती देणे आवश्यक आहे. पण यापैकी प्रशासनाकडून काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासी अनभिज्ञ आहेत. एसटीकडून लपवाछपवी केली जातेय की काय? असा प्रश्न दत्तात्रय फडतरे यांनी उपस्थित केला. 

Web Title: Hide in incremental pass by st department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.