व्यसनांच्या पूर्ततेसाठी वाट्टेल ते! दुधाच्या कॅनमागे लपवले बियरचे बॉक्स..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:47 PM2020-04-14T12:47:41+5:302020-04-14T12:51:25+5:30
लॉकडाउनच्या काळात व्यसनाधीनांच्या सेवेसाठी वाट्टेल ते...
पुणे : दुधाच्या कॅनमागे बियरचे बॉक्स लपवून ते शहरात आणणाऱ्या एका वाहनचालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कात्रज घाटात वाहनांची तपासणी करताना ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकाकडून 28 हजार 800 रुपयांचे बियरचे 12 बॉक्स जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 ते 14 एप्रिल रोजी रात्री अकरा सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी पारखे, पोलीस नाईक तोंडे, भिंगारे हे नाकाबंदी करीत असताना त्यांना त्याठिकाणी एक दुधाची वाहतूक करणारा टेम्पो आढळून आला. तो तपासत असताना वाहनचालकाच्या बोलण्यावरुन पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. तसेच टेम्पो तपासला असता त्यात दुधाच्या क्रेट मागे लपवलेले 28 हजार 800 रुपये किंमतीचे बियरचे 12 बॉक्स पोलिसांना दिसले. पोलिसानी मुद्देमालासह वाहनचालकाला ताब्यात घेतले. याप्रकरनात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शहरात लॉकडाऊन आहे. सगळीकडे जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच एकीकडे दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात दारूच्या दुकानांवर हल्ले करून दारूची चोरी करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.