पुण्यातही ‘हाय अ‍ॅलर्ट’

By admin | Published: July 28, 2015 04:35 AM2015-07-28T04:35:23+5:302015-07-28T04:35:23+5:30

पंजाबमधील गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुण्यालाही हाय अ‍ॅलर्ट देण्यात आला असून, पुणे पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.

'High alert' in Pune | पुण्यातही ‘हाय अ‍ॅलर्ट’

पुण्यातही ‘हाय अ‍ॅलर्ट’

Next

पुणे : पंजाबमधील गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुण्यालाही हाय अ‍ॅलर्ट देण्यात आला असून, पुणे पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. यासोबतच सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागामध्ये गस्त वाढवण्याच्या, नाकाबंदी लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त संजय पाटील यांनी दिली.
पुणे शहराला दहशतवादी हल्ल्यांच्या दृष्टीने कायमस्वरूपी अ‍ॅलर्ट आहे. पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये, १ आॅगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर तसेच १० जुलै २०१४ रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. यासोबतच कोरेगाव पार्क भागातील ज्यू धर्मीयांचे धार्मिक स्थळ असलेल्या छाबड हाऊस, ओशो आश्रम, दगडूशेठ गणपती मंदिरालाही कायमस्वरूपी ‘रेड अ‍ॅलर्ट’ आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमच सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असतो. पोलिसांनी शहरातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील अशा ५२ ठिकाणांची यादी केलेली असून, तेथील सुरक्षेची वारंवार तपासणी करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्याच्या, नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकांना शहरातील सर्व बस स्थानके, रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बीडीडीएसने स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, चिंचवडसह काही ठिकाणी तपासणीला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पुण्याला कोणताही अ‍ॅलर्ट दिल्याचे यंत्रणांनी कळवले नसले, तरी सावधगिरी म्हणून शहर पोलिसांनी आवश्यक पावले उचलली असल्याचेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

दहशतवादी हल्ला पोलीस ठाणी, शासकीय कार्यालये तसेच मॉल यांसह कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनीही जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. पुण्यामधील बॉम्बस्फोटांतील आरोपी तसेच एटीएसने नुकतेच पकडलेले नक्षलवादी खोल्या भाड्याने घेऊन राहिलेले होते. या कोणत्याही घटनेत भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भाडेकरू ठेवताना पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. एटीएसच्या पुणे विभागाने अंतर्गत ‘इनपुट’ तपासायला सुरुवात केली आहे. पंजाबमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबऱ्यांना सावध करण्यात आले असून, खबरदारी घेण्यात येत आहे.
- भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त, एटीएस, पुणे

Web Title: 'High alert' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.