ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:09+5:302021-05-12T04:13:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत कोरोनाबाधितांचा आकडा ग्रामीण भागात वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा दर कायम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत कोरोनाबाधितांचा आकडा ग्रामीण भागात वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा दर कायम आहे. मंगळवारी पुण्यात २ हजार ४०४, पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ५४७, तर ग्रामीण भागात ३ हजार ७६३ रुग्ण आढळले. ही वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, हे प्रमाण आता कमी झाले असून, त्याची जागा ग्रामीण भागाने घेतली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ग्रामीण भागात ३ हजार १५६, तर नगरपालिका क्षेत्रात ५२७. तर कटक मंडळ क्षेत्रात ८० कोरोनाबाधित आढळले. तिन्हींची रुग्णसंख्या मिळूण ३ हजार ७६३ एवढी झाली आहे. रोजच्या रुग्णसंख्येत ग्रामीण भागातील आकडेवारी सर्वाधिक असल्याने रुग्णवाढीचा केंद्रबिंदू ग्रामीण भागाकडे वळला आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी एकूण ३२ हजार ६९५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. यापैकी ७ हजार ७१४ नमुने हे पॉझिटिव्ह आढळले. तर, ८ हजार ७७५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्याचा मंगळवारचा पाॅझिटिव्हिटीचा दर हा २८.२७ टक्के एवढा होता. रिकव्हरी रेट हा ८८.७३ एवढा होता. तर १.८ जिल्ह्याचा मृत्यूदर होता.