गुंड सचिन पोटेला उच्च न्यायालयाचा दिलासा; ३० एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:21 AM2021-04-06T01:21:30+5:302021-04-06T01:24:16+5:30
मुंढवा येथील टिकी लाऊंज पबमध्ये जून २०१८ मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते.
पुणे : मुंढवा भागातील एका पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणात पोलिसांनी गुंड सचिन पोटेसह त्याच्या १० साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने गुंड सचिन पोटे याला दिलासा दिला असून ३० एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंढवा येथील टिकी लाऊंज पबमध्ये जून २०१८ मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेथे निलेश चव्हाण व त्याचे साथीदार आले होते. तेथे सचिन पोटे, अजय शिंदे व त्याचे साथीदार आले होते. निलेश चव्हाण याच्या नावाने वारंवार अनाऊंमेट झाल्याने सचिन पोटे व निलेश चव्हाण यांच्यात वाद झाला. तेव्हा सचिन पोटे याने आपल्याकडील पिस्तुलातून निलेश चव्हाण याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. पोटे याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये तोडफोड करुन सीसीटीव्हीचा डीव्हीआर जबरदस्तीने घेऊन गेले होते. याप्रकरणी तेव्हा केवळ हॉटेलमधील तोडफोडीबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. नुकतेच याप्रकरणी फिर्यादीने आता गोळीबाराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सचिन पोटेसह १० जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. सचिन पोटे सध्या फरारी आहे.
मोक्का कारवाईविरोधात ज्येष्ठ वकिल आबाद पोंडा यांच्यामार्फत सचिन पोटे याने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हा प्रकार २०१८ मधील असून तेव्हा फिर्यादीने केवळ हॉटेलमध्ये तोडफोड झाल्याची तक्रार दिली होती. आता पोलिसांच्या सांगण्यावरुन फिर्यादीने ४ मार्च २०२१ रोजी गोळीबारची तक्रार दिली असल्याचे अॅड. पोंडा यांनी सांगितले.
न्यायालयाने याबाबत पोलिसांना त्यांंचे म्हणणे मांडण्यास सांगितले असून तोपर्यंत आरोपीवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार असून तोपर्यंत तपास अधिकार्यांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिला आहे.
आरोपींच्या वतीने अॅड. आबाद पोंडा, अॅड. विपुल दुशिंग, अॅड. तेजस पुणेकर यांनी काम पाहिले.