TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळ्यातील सौरभ त्रिपाठीला उच्च न्यायालयाकडून जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:50 PM2022-04-20T18:50:03+5:302022-04-20T18:53:08+5:30
पुणे : संपूर्ण राज्यात गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सौरभ त्रिपाठी याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अपात्र ...
पुणे : संपूर्ण राज्यात गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सौरभ त्रिपाठी याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणाऱ्याच्या कटामध्ये अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याबरोबर त्याने दिल्लीत बैठक घेऊन कट रचला असल्याचा आरोप त्रिपाठीवर आहे. टीईटी प्रकरणात आतापर्यंत ३५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी जामीन मिळालेला त्रिपाठी हा पहिलाच आरोपी आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी सौरभ त्रिपाठी याला उत्तर प्रदेशातील लखनौ येथून अटक केली होती. २०१८ च्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्रिपाठी ह्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सौरभ त्रिपाठी विनर नावाची कंपनी चालवतो. त्याच्या या कंपनीने २०१७ साली शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीला मिळवून देण्यासाठी मध्यस्थाचे काम केले होते. २०१७ ते २०२०२ पर्यंत हे कंत्राट जी ए टेक्नॉलॉजीकडे होते. मात्र त्यानंतर मागील वर्षी हे कंत्राट सौरभ त्रिपाठीच्याच विनर कंपनीला देण्यात आले आहे.
सौरभ त्रिपाठी याच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी न्यायाधीश सी. व्ही. भडंग यांच्यासमोर झाली. ॲड. अनिकेत निकम यांनी युक्तीवाद केला की, ज्या कंपनीला परीक्षा घेण्याची जबाबदारी २०१८ साली सोपविण्यात आली होती. त्या कंपनीशी संबंधित त्रिपाठी नव्हता. सौरभ त्रिपाठी याला या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा झाला नाही. पोलिसांच्या तपासात त्रिपाठी याला कुठलाच फायदा झाल्याचे निष्पन्न झाले नाही. सरकारी वकीलांनी जामीनाला विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सी. व्ही. भडंग यांनी त्रिपाठी याला जामीन मंजूर केला आहे.