हायटेक प्रचार मतदारांची डोकेदुखी
By admin | Published: January 22, 2017 04:34 AM2017-01-22T04:34:46+5:302017-01-22T04:34:46+5:30
जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे जोरदार घोंगाऊ लागले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. यात सोशल मीडिया हे प्रभावी आणि
पेठ : जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे जोरदार घोंगाऊ लागले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. यात सोशल मीडिया हे प्रभावी आणि सोपे साधन असल्यामुळे प्राधान्याने त्याचा वापर होत आहेत. विविध व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे मतदारांना एकत्र करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. मात्र, ग्रुपचा वाढता भार आणि भरलेला ‘इनबॉक्स’ यामुळे नेमके वाचायचे काय, असा प्रश्न मतदारराजाला पडला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या या मेसेजमुळे मात्र ग्रामीण भागात सोशल मीडिया नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
२०१४च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच थेट मतदारांना आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी भाजपला याच सोशल मीडियाने तारले. आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लागल्या असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाच नव्हे, तर सर्वच पक्षांचा भर हा सोशल मीडियावर आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी ‘मिशन पंचायत समिती, मिशन २०१७, मिशन झेडपी’ अशा प्रकारे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार
केले आहे.
सकाळपासून सुप्रभात तर रात्री बारापर्यंत शुभरात्रीसारख्या पोस्ट पाठवून मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हात जोडलेले छायाचत्रे पाठवून सोबत आपल्या पक्षाचे चिन्ह किंवा नेत्यांचे छायाचित्र जोडून दिनविशेषसारख्या तयार पोस्ट मतदारांना पाठविल्या
जात आहेत. (वार्ताहर)
अनेक उमेदवार फेसबुकवर आपले मित्र वाढवताना दिसत आहेत. प्रत्येकाचे आडनाव किंवा गाव बघून गण-गटातील प्रत्येकाला आपला फेसबुक मित्र बनवण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. आंबेगाव तालुक्यातील इच्छुक उमेदवार सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत. या अनवश्यक फ्रेंडरिक्वेस्ट आणि व्हॉट्सअॅप मेसेज मात्र मतदारांची डोकेदुखी ठरत आहेत.