सासूने सुनेबरोबर घेतले उच्च शिक्षण
By admin | Published: March 9, 2017 04:12 AM2017-03-09T04:12:08+5:302017-03-09T04:12:08+5:30
सासूने सुनेबरोबर उच्च शिक्षण घेतले असून, जगभरात साजऱ्या होत असलेल्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समस्त माहिलांना अभिमान वाटेल, अशी घटना खेड तालुक्यात घडली.
दावडी : सासूने सुनेबरोबर उच्च शिक्षण घेतले असून, जगभरात साजऱ्या होत असलेल्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समस्त माहिलांना अभिमान वाटेल, अशी घटना खेड तालुक्यात घडली. अपुरे राहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न आपल्या सुनेबरोबर पूर्ण करून प्रेरणादायी उदाहरण शांताबाई गावडे यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.
खेड तालुक्यातील जळऊके बुद्रुक येथील शांताबाई कांताराम गावडे या वयाच्या ५४व्या वर्षी सुनेबरोबर शिक्षण घेऊन पदवीधारक बनल्या आहेत. शांताबार्इंच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना इयत्ता ९वीतूनच शाळा सोडावी लागली. लग्न झाल्यानंतर शेतकाम व चूल आणि मूल असा संसार सुरू होता. मात्र, शिक्षणाची ओढ त्यांना स्वत: बसू देत नव्हती. चार मुली, एक मुलगा यांचा संभाळ करून त्यांची लग्न करून, गावात अंगणवाडी सेविकेचे काम करीत असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. त्यांची सूनबाई प्राची गावडे यांनी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात विज्ञान शाखेतून सासू शांताबाई यांच्याबरोबर आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
नुकतेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभात पद्मश्री शीतल महाजन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. पती कांताराम गावडे यांच्या प्रोत्साहानामुळे मी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.