हेमंती कुलकर्णींना सर्वाधिक लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:06 AM2018-05-18T01:06:42+5:302018-05-18T01:06:42+5:30
डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपन्यांमध्ये प्रथमदर्शनी उघड झालेल्या २ हजार ४३ कोटी गैरव्यवहाराचा सर्वाधिक लाभ डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना झाल्याचे स्पष्ट झाले.
पुणे : डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपन्यांमध्ये प्रथमदर्शनी उघड झालेल्या २ हजार ४३ कोटी गैरव्यवहाराचा सर्वाधिक लाभ डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना झाल्याचे स्पष्ट झाले.
डी़ एस़ कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुरुवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले़ त्यामध्ये हा पैसा कोठे कोठे वळविला हे उघड झाले असून, प्रामुख्याने सोलापूर रोडवरील डीएसके यांच्या ड्रिम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवात केली़ ‘सेझ’च्या प्रकल्पात प्रमुख अट असते ती म्हणजे हा प्रकल्प ठराविक काळात पूर्ण होऊ शकला नाही, तर प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी पुन्हा ज्यांच्याकडून खरेदी केल्या़, त्यांना परत द्याव्या लागतात़ या जमिनी पुन्हा परत द्याव्या लागू नयेत, म्हणून डी़ एस़ कुलकर्णी यांनी या ड्रिम सिटीसाठीच्या जमिनी शेतकऱ्यांकडून अगोदर आपल्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्या़ नंतर त्या डीएसकेडीएल या कंपनीला दोन ते अडीच पट जादा दराने देण्यात आल्या़ त्यानंतर नातेवाइकांकडून मिळालेल्या पैशातील महत्त्वाचा वाटा हा हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आला़ या प्रकल्पासाठी सहा राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज ४७७ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले़ त्यापैकी ३७७ कोटी रुपये खात्यात जमा झाले होते़ त्यापैकी केवळ पावणेदोनशे कोटी रुपयेच या प्रकल्पावर खर्च केले़ सर्वाधिक पैसा हा हेमंती कुलकर्णी यांच्या खात्यावर वळविला आहे़ डीएसकेडीएल या पब्लिक लि़ लिस्टेड कंपनीबरोबर डीएसके यांनी ८ भागीदारी कंपन्या स्थापन केल्या़ त्यांच्या नावाने ठेवी स्वीकारल्या़ त्यातील काही पैसाही हेमंती कुलकर्णी यांच्या नावावर; तसेच शिरीष कुलकर्णी यांच्या नावावरील कंपन्यांमध्ये वळविले. काही बँक खात्यात तर १७ वेळा हा पैसा फिरविण्यात आल्याचे दिसले आहे़ डीएसके यांची २३७ बँक खाती गोठविली आहेत़ त्यापैकी काही खात्यांच्या तपासणीतून हा प्रकार उघड झाला असून, सर्व बँक खात्यांमधील व्यवहारांची तपासणी झाल्यानंतरच नेमका हा गैरव्यवहार किती हजार कोटींचा असून, त्यातील पैसा नेमका कोठे गेला हे समजेल.
>साड्यांवर लाखोंनी खर्च
‘ड्रिम सिटी’साठी घेतलेल्या ठेवींमधील मोठी रक्कम हेमंती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळविण्यात आली आहे़ या खात्यातून त्यांनी चपला, साड्या केटरिंगची बिले मोठ्या प्रमाणावर अदा केली़ अगदी दुधाची बिलेही त्यातून दिली.